म्हाडा वसाहतीत पोलिसांचा छापा गोव्याची विदेशी दारु हस्तगत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2019 22:46 IST2019-12-16T22:45:43+5:302019-12-16T22:46:06+5:30
१ लाख १५ हजाराचा मुद्देमाल : एकाविरुध्द गुन्हा दाखल

म्हाडा वसाहतीत पोलिसांचा छापा गोव्याची विदेशी दारु हस्तगत
धुळे : मोहाडी शिवारातील म्हाडा वसाहतीत पोलिसांनी रविवारी सायंकाळी उशिरा एका घरावर छापा टाकला़ त्यात १ लाख १५ हजार ८२० रुपयांची गोव्यातील विदेशी दारु हस्तगत केली़ याप्रकरणी एकाविरुध्द मोहाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला़ या कारवाईमुळे म्हाडा वसाहतीत चर्चेला उधाण आले होते़
उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे यांनी यासंदर्भात गोपनीय माहिती मिळाली होती़ मोहाडी गावातील तिखी रोडवर असलेल्या म्हाडा वसाहतीत मुक्तार मुन्ना कुरेशी या संशयिताने घरात महागड्या विदेशी दारुचा साठा करुन ठेवला असल्याचे कळाल्याने मोहाडी पोलीस निरीक्षक सतिष गोराडे यांना छापा टाकून कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले़ त्यानुसार, मोहाडी पोलीस ठाण्याच्या शोध पथकातील हेड कॉन्स्टेबल प्रभाकर ब्राह्मणे, कर्मचारी तुषार जाधव, गणेश भामरे, जितेंद्र वाघ, सचिन वाघ, दीपक महाले, कांतीलाल शिरसाठ यांनी रविवारी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास म्हाडा वसाहतीत जावून एका घरावर छापा टाकला़ या ठिकाणी केवळ गोवा राज्यात विक्रीची परवानगी असलेल्या महागड्या दारुच्या बाटल्या आढळून आल्या़ मोहाडी पोलिसांनी त्या जप्त केल्या आहेत़ महाराष्ट्रात बाजारभावानुसार त्यांची किंमत १ लाख १५ हजार ८२० रुपये इतकी आहे़ सदरचा दारुसाठा बाळगणारा मुक्तार मुन्ना कुरेशी या संशयिताविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला़ घटनेचा तपास हेड कॉन्स्टेबल प्रभाकर ब्राह्मणे करीत आहेत़