११ हातगाड्यांवर पोलिसांची कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2020 13:01 IST2020-03-19T13:00:50+5:302020-03-19T13:01:16+5:30
आग्रा रोड : वाहतुकीला अडथळा

dhule
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : शहरातील आग्रा रोडवरील वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी पोलिसांच्या वाहतू शाखेने बुधवारी ११ लोटगाड्या जप्त करुन कारवाई केली़
देशासह राज्यात आणि जिल्ह्यात सर्वत्र केवळ कोरोनाच्या बातम्यांनी प्रसारमाध्यमे व्यापली असताना पोलिसांनी वाहतूक सुरळीत करण्यासाठी हॉकर्सविरुध्द मोहिम सुरू केली आहे़ शहरातील आग्रा रोडवर वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या भाजीपाला विक्रेत्यांच्या हातगाड्या पोलिस ठाण्यात जप्त करण्यात आल्या आहेत़ विशेष म्हणजे कोरोनामुळे आग्रा रोडवर वर्दळ नसताना पोलिसांनी केलेल्या या कारवाईबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे़
आग्रा रोड हा धुळे शहराची मुख्य बाजारपेठ आहे़ त्यामुळे या रोडवर बाजार करण्यासाठी धुळेकरांसह ग्रामीण भागातील नागरीकांची गर्दी होत असते़ रस्त्याच्या दुतर्फा हातगाड्या लावल्यामुळे चालायला देखील जागा शिल्लक राहत नाही़ वाहतुकीची नेहमीच कोंडी होते़ वर्दळीच्या वेळी कारवाई न करता आता गर्दी नसताना कारवाई करण्यात आल्याने प्रश्न उपस्थित केले जात आहेत़ परंतु याआधी देखील हॉकर्सवर अनेकवेळा कारवाई झली आहे़