लळींग किल्ल्याच्या पायथ्याशी वृक्षारोपण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2020 22:00 IST2020-07-25T22:00:21+5:302020-07-25T22:00:56+5:30
उत्स्फूर्त सहभाग । ‘गुड मॉर्निंग, बी पॉझिटिव्ह’ ग्रुपचा उपक्रम

dhule
धुळे : येथील ‘गुड मॉर्निंग बी पॉझिटिव्ह’ ग्रुपतर्फे शनिवारी वृक्ष लागवड मोहिमेचे औचित्य साधून लळिंग येथे द. वा. पाटील हायस्कूलच्या प्रांगणात व किल्ल्याच्या पायथ्याशी परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.
गुड मॉर्निंग बी पॉझिटिव्ह ग्रुपतर्फे सामाजिक बांधिलकीचे उपक्रम या शहरात अनेक वर्षांपासून सुरु आहेत़ शनिवारी लळिंग किल्ला येथे निसर्गाचा मनमुराद आनंद घेण्यासाठी ट्रेकिंगचे आयोजन ग्रुपतर्फे केले होते़ ग्रुपमधील वीस ते पंचवीस सदस्यांनी शनिवारी नवीन किल्ला येथे सकाळी साडेपाच वाजताच भेट देऊन चढाईस प्रारंभ केला़ तसेच लळिंग किल्ल्यावर स्वच्छता मोहिम राबवून वृक्षारोपण करण्यात आले़
तदनंतर किल्ल्याच्या पायथ्याशी तसेच द़ वा़ पाटील शाळेच्या प्रांगणात सुमारे वीस वृक्षांची लागवड करण्यात आली. यावेळी ग्रुपच्या माध्यमातून वृक्ष लागवड करण्याबाबत जनजागृती करीत वृक्षारोपण करण्याचे आवाहन नागरिकांना केले़
या मोहिमेत गु्रपचे सदस्य तथा मनपाचे सहायक आरोग्य अधिकारी चंद्रकांत जाधव, स्वच्छता निरीक्षक महेंद्र ठाकरे, भरत येवलेकर, चंद्रकांत सोनार आदींसह ग्रामस्थांनी सहभाग नोंदविला़ कार्यक्रम यशस्वितेसाठी लळिंगचे सामाजिक कार्यकर्ते शिवाजी वाघ यांनी परिश्रम घेतले. याप्रसंगी गुड मॉर्निंग ग्रुपचे सदस्य मनोज वाघ, ओमप्रकाश खंडेलवाल कैलास मासाळ, रमेश वर्मा, रमेश सावंत, महेंद्र लगडे, कमल किशोर भट्टड, निरज वाघ, यश देवरे, आयुष खंडेलवाल, पंकज शर्मा, अनिल देवपूरकर, प्रदीप चव्हाण, कुणाल मासाळ, सचिन अग्रवाल आदी उपस्थित होते.