पिंपळनेरला एटीएम फोडण्याचा प्रयत्न फसला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 20:15 IST2021-03-21T20:15:49+5:302021-03-21T20:15:58+5:30
तीन चोरटे सीसीटीव्ही कॅमेरात कैद, गुन्हा दाखल

पिंपळनेरला एटीएम फोडण्याचा प्रयत्न फसला
धुळे/पिंपळनेर - पिंपळनेर ते सटाणा रस्त्यावर एका हॉटेल शेजारी असलेले एटीएम मशिन चोरट्याने फोडण्याचा प्रयत्न केला़ पण, त्यांचा हा प्रयत्न फसला असलातरी मशिनचे मात्र नुकसान झाले आहे़ हा प्रकार शनिवारी पहाटे पावणे तीन वाजेच्या सुमारास घडला़ याची नोंद सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास करण्यात आली़
साक्री तालुक्यातील पिंपळनेर ते सटाणा रोडवर असलेल्या विजयानंद हॉटेलच्या बाजूला इंडिया वन नावाचे एटीएम केंद्र आहे़ परिसरातील नागरीकांना या एटीएमचा फायदा होतो़ शनिवारी पहाटे पावणे तीन वाजेच्या सुमारास चोरटा या ठिकाणी मशिन फोडून पैसे घेण्याच्या उद्देशाने आला़ पण, मशिन फोडण्यात तो अपयशी ठरला़ त्यानंतर त्याने एटीएम मशिनचे मॉनिटर, डायल पॅड, विड्रॉल बॉक्स, पैसे भरणा करण्याचा वॉल्टचा दरवाजा तसेच सेटिंग वायर तोडून नुकसान केले आहे. ही घटना सकाळी उजेडात आली़ या एटीएम केंद्रात आणि बाहेरच्या भागात सीसीटीव्ही कॅमेरा बसवण्यात आले असल्याने या घटनेत सीसीटीव्हीत तीन चोरटे दिसत आहेत़ त्यांनी तोंडाला रुमाल बांधलेला दिसून आले़ एटीएम तोडण्याचे साहित्य त्यांच्या हातात असल्याचे त्यांच्या हातात दिसत आहे़ हे तीनही चोरटे घटनेनंतर पळून गेले आहेत़ गुन्हा दाखल झाल्याने पिंपळनेर पोलीस त्यांच्या मागावर आहेत़
पिंपळनेर येथील बसस्थानक परिसरात असलेल्या एका व्यक्तीला आवाज ऐकू आला़ त्याला काहीतरी होत असल्याचा संशय आल्याने त्याने पिंपळनेर पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर त्या व्यक्तीला पाहताच चोरट्यांनी एटीएम केंद्रावरुन पळ काढला़ इंडिया वन एटीएमचे विरल सुरेशभाई कुवाडिया (रा.नंदुरबार) यांनी पिंपळनेर पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्याने चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ घटनेचा तपास हेड कॉन्स्टेबल प्रवीण अमृतकर करीत आहेत.