पिकअप वाहन पुलावरुन कोसळली, ८ ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2019 15:34 IST2019-11-30T15:24:32+5:302019-11-30T15:34:59+5:30
धुळे ते सोलापूर मार्ग : ५ गंभीर, १९ जखमी रुग्णालयात

पिकअप वाहन पुलावरुन कोसळली, ८ ठार
धुळे : मध्यप्रदेशातील बडवानी जिल्ह्यातील धवल्या व धवल्यागिरी येथून मजूर घेऊन जाणारी पिकअप वाहन बीडकडे जात असताना धुळे तालुक्यातील विंचूर गावानजिक पुलावरुन कोसळली़ अपघाताची ही घटना शनिवारी पहाटे साडेबारा वाजेच्या सुमारास घडली़ यात ८ जण जागीच ठार झाले आहेत़ तर, ५ जणं गभीर तर १९ जण जखमी झाले आहेत़
घटना लक्षात येताच रात्रीच मदतकार्य सुरु झाले़ दरम्यान, मयतमध्ये बालकांचा अधिक समावेश आहे़ जखमी आणि मयतांना रुग्णवाहिकेतून हिरे वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले़ मध्यप्रदेशातील बडवानी जिल्ह्यातील सेंधवा तालुक्यातील धवल्या व धवल्यागिर येथून एमएच २५ पी ३७७० क्रमांकाच्या पीकअप वाहनातून बीड येथील गुळाची भेली तयार करण्याच्या कारखान्यात काम करण्यासाठी मजुरांना नेले जात होते़ सोलापूर मार्गावर धुळे तालुक्यातील विंचूर गावानजिक असलेल्या बोरी-कानोली नदीवरील ब्रिटीशकालीन पुलाजवळ येताच भरधाव वेगात असलेली पिकअप वाहन थेट पुलावरुन खाली कोसळली़ नदीत असलेल्या दगडामुळे पीकअप वाहन दोन ते तीन पलट्या घेतल्यानंतर चक्काचूर झाला़
या अपघातात रितेश लेदाराम आर्य (०६ महिने), जिन्या अंबू पावरा (१३), मियाली लेदाराम आर्य (२३), रविना लेदाराम आर्य (५), करण सेवासिंग बारेला (३), हरमसिंग सेवासिंग बारेला (५), लालसिंग अंबू पावरा (२०), गुड्डीबाई तुफानसिंग बारेला (३०) (सर्व रा़ धवल्यागिरी ता़ सेंधवा जि़ बडवानी, मध्यप्रदेश) या आठ जणांचा मृतांमध्ये समावेश आहे़ तसेच पाच जण गंभीर आहेत़ त्यांच्यावर हिरे वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरु आहेत़ अपर पोलीस अधीक्षक डॉ़ राजू भुजबळ, धुळे तालुका पोलीस निरीक्षक दिलीप गांगुर्डे आणि पथक घटनास्थळी दाखल झाले होते़