जिल्ह्यात नायलॉन मांजावर कायमस्वरूपी बंदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:34 IST2021-01-13T05:34:09+5:302021-01-13T05:34:09+5:30
दोन पतंगामध्ये (दोऱ्याचे) घर्षण होऊन मोठ्या प्रमाणात मांजा तुटून उंच झाडे व इमारतींमध्ये मांजा अडकतो. त्यामुळे पक्ष्यांच्या जीवितास धोका ...

जिल्ह्यात नायलॉन मांजावर कायमस्वरूपी बंदी
दोन पतंगामध्ये (दोऱ्याचे) घर्षण होऊन मोठ्या प्रमाणात मांजा तुटून उंच झाडे व इमारतींमध्ये मांजा अडकतो. त्यामुळे पक्ष्यांच्या जीवितास धोका निर्माण होऊन वन्य पशु-पक्षी जखमी, मृत होतात. पतंगासह तुटलेल्या नायलॉन मांजाच्या धाग्यांचे तुकडे जमिनीवर पडून, त्याचे विघटन होण्यासारखे नसल्याने गटार, नदी, नाल्यासारख्या नैसर्गिक प्रवाहात अडथळे निर्माण करतात. गाय अथवा तत्सम प्राण्यांनी नायलॉन मांजाचे तुकडे समाविष्ट असलेले खाद्य सेवन केल्यामुळे त्यांना गुदमरण्याचा त्रास होतो. अशा प्रकारे मांजा, धाग्यांमधील प्लास्टीकच्या वस्तूंमुळे विविध प्रकारचे दुष्परिणाम होत असतात. प्लास्टीक किंवा कृत्रिम वस्तूंचा वापर करून बनविलेला व सर्वसाधारण नायलॉन मांजा या नावाने परिचित असलेल्या पक्क्या धाग्यामुळे पक्षी व मानवी जीवितास इजा पोहोचली जाते. काही प्रसंगी त्या इजा प्राणघातक ठरतात. त्यामुळे पतंग उडविण्याच्या नायलॉन मांजा, धाग्यामुळे होणाऱ्या प्राणघातक इजांमधून पक्षी व मानवाच्या जीविताचे संरक्षण करण्यासाठी नायलॉन मांजाची साठवणूक, विक्री, निर्मिती व वापरावर बंदी घालणे आवश्यक आहे. त्यानुसार पर्यावरण अधिनियम, राज्य शासनाच्या पत्रानुसार हे आदेश देण्यात आले आहेत. त्यानुसार, मकरसंक्रांत या सणाच्या व इतर वेळेस पतंग उडविण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या प्लास्टीक किंवा इतर कृत्रिम वस्तूंपासून बनविलेल्या नायलॉन मांजा या नावाने परिचित असलेल्या पक्क्या धाग्याच्या निर्मिती, विक्री, साठवणूक व वापर करण्यास संपूर्ण धुळे जिल्ह्यात कायमस्वरूपी बंदी घालण्यात येत आहे. जिल्ह्यातील सर्व घाऊक व्यापारी, किरकोळ व्यापारी, साठवणूकदारांना नायलॉन मांजाची विक्री व साठवणूक करण्यास प्रतिबंध करण्यात येत आहे. या आदेशाच्या अंमलबजावणीसाठी सर्व स्थानिक स्वराज्य संस्था, पोलिसांनी स्वतंत्ररीत्या पथके तयार करून आवश्यक ती कार्यवाही करावी. या आदेशाचे कोणतीही व्यक्ती, संस्था यांनी उल्लंघन केल्यास ही बाब ही पर्यावरण (संरक्षण) अधिनियम १९९६चे कलम १५ अन्वये शिक्षेस पात्र राहील, असेही जिल्हाधिकारी यादव यांनी म्हटले आहे.