कोरोनाच्या रोज ५ हजार चाचण्या करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 04:35 IST2021-05-13T04:35:57+5:302021-05-13T04:35:57+5:30

धुळे : जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी दररोज किमान पाच हजार चाचण्या करा, तसेच बाधित रुग्णाच्या संपर्कातील अधिकाधिक व्यक्तींच्या ...

Perform 5,000 coronal tests daily | कोरोनाच्या रोज ५ हजार चाचण्या करा

कोरोनाच्या रोज ५ हजार चाचण्या करा

धुळे : जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी दररोज किमान पाच हजार चाचण्या करा, तसेच बाधित रुग्णाच्या संपर्कातील अधिकाधिक व्यक्तींच्या चाचण्या कराव्यात, असे निर्देश जिल्हाधिकारी संजय यादव यांनी दिले आहेत.

जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवारी दुपारी कोरोना विषाणू संसर्गाच्या अनुषंगाने आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वान्मथी सी., महानगरपालिकेचे आयुक्त अजीज शेख, हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे, अपर जिल्हाधिकारी दिलीप जगदाळे, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव, निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड, उपविभागीय अधिकारी भीमराज दराडे (धुळे), डॉ. विक्रम बांदल (शिरपूर), जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. महेश भडांगे, जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवले, वैद्यकीय महाविद्यालयाचे विशेष कार्य अधिकारी डॉ. दीपक शेजवळ, महानगरपालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. महेश मोरे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. विशाल पाटील यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले की, जिल्ह्यात कोरोना विषाणूचा पॉझिटिव्हिटी दर कमी होईल, असे नियोजन करावे. लसीकरण केंद्रावर येणाऱ्या व्यक्तीजवळ त्याचा अलीकडील अहवाल कोरोना निगेटिव्ह नसेल, तर अशा व्यक्तीची चाचणी करावी. यामुळे कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यास मदत होईल. कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेत रुग्णसंख्या कमी होताना दिसत असली, तरी आरोग्य यंत्रणेने सतर्क राहणे आवश्यक आहे. याबरोबरच संभाव्य तिसऱ्या लाटेसाठी आतापासूनच पायाभूत सोयीसुविधांच्या निर्मितीवर भर द्यावा. त्यासाठी आवश्यक निधीचे प्रस्ताव तातडीने सादर करावेत.

ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प मार्गी लावा

जिल्ह्यात आमदार निधी, सामाजिक दायित्व निधी आणि डीआरडीओ यांच्या माध्यमातून ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प कार्यान्वित करण्यात येत आहे. त्यांची प्रशासकीय प्रक्रिया तातडीने पूर्ण करीत ते कार्यान्वित करावेत. पन्नासपेक्षा अधिक खाटा असलेल्या खासगी रुग्णालयांनी ऑक्सिजन निर्मितीचा प्रकल्प कार्यान्वित करण्यासाठी महानगरपालिकेने पाठपुरावा करावा. साक्री व पिंपळनेर येथील ग्रामीण रुग्णालयात ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प कार्यान्वित करतानाच ‘कोविड १९’करिता खाटांची संख्या वाढवावी. त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने अंदाजपत्रक सादर करावे, अशा सूचना त्यांनी दिल्या.

कोरोना विषाणूचे लवकर निदान होऊन रुग्ण औषधोपचारासाठी रुग्णालयात लवकर आला पाहिजे. त्यासाठी गावपातळीवरील आपत्ती निवारण समितीच्या सदस्यांना सक्रिय करावे. या समिती सदस्यांच्या माध्यमातून गावागावात जनजागृती करावी. संभाव्य तिसऱ्या लाटेसाठी मनुष्यबळाचे नियोजन करावे. नियुक्ती प्रक्रिया तातडीने पूर्ण करीत आवश्यक त्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षणाचे नियोजन करावे. कोरोना विषाणूबाधित प्रत्येक रुग्णाच्या बिलाचे लेखा परीक्षण तातडीने पूर्ण करावे, तसेच प्लाझ्माच्या शासन दराबाबत प्रत्येक रक्तपेढीत फलक लावावेत, असेही निर्देश जिल्हाधिकारी यादव यांनी दिले.

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वान्मथी सी. यांनी कोरोना प्रतिबंधासाठी करावयाच्या उपाययोजना याविषयी मार्गदर्शन केले.

Web Title: Perform 5,000 coronal tests daily

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.