ठेकेदाराने करारनाम्यानुसार काम न केल्यास होणार दंडात्मक कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:39 IST2021-09-22T04:39:46+5:302021-09-22T04:39:46+5:30

धुळे महापालिकेने पावसाळ्यापूर्वी डेंग्यू निर्मूलनासाठी ठेका दिला आहे, तरीही डेंग्यूचे रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले ...

Penalty action will be taken if the contractor does not work as per the contract | ठेकेदाराने करारनाम्यानुसार काम न केल्यास होणार दंडात्मक कारवाई

ठेकेदाराने करारनाम्यानुसार काम न केल्यास होणार दंडात्मक कारवाई

धुळे महापालिकेने पावसाळ्यापूर्वी डेंग्यू निर्मूलनासाठी ठेका दिला आहे, तरीही डेंग्यूचे रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. मनपा आरोग्य व मलेरिया विभागाकडून तातडीने यावर उपाययोजना कराव्यात, तसेच ठेकेदाराने करारनाम्यानुसार शहरात मोहीम राबवावी, अन्यथा त्या ठेकेदारावर दंडात्मक कारवाई केेली जाईल, असा इशारा बैठकीत नवनियुक्त महापौर प्रदीप कर्पे यांनी दिला.

महापालिकेच्या महापौर कर्पे यांच्या दालनात मंगळवारी सकाळी डेंग्यूसंदर्भात मलेरिया व आरोग्य विभागाची बैठक घेण्यात आली. यावेळी माजी महापौर चंद्रकांत सोनार, आयुक्त देविदास टेकाळे, उपायुक्त गणेश गिरी, भाजप जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल, सहायक आयुक्त नितीन कापडणीस, नारायण सोनार, पल्लवी शिरसाठ, आरोग्य अधिकारी डॉ. महेश मोरे, नगरसेवक शीतल नवले, देवेंद्र सोनार, माजी विरोधी पक्षनेता साबीर शेख आदी उपस्थित होते. यावेळी आरोग्य अधिकारी डॉ. मोरे म्हणाले की, डेंग्यू व मलेरियावर नियंत्रण मिळविण्यासाठी मनपा व खासगी कंपनीचे कर्मचारी शहरात मोहीम राबवित आहेत. ठेकेदाराला महापालिकेचे २० कर्मचारी देण्यात आले आहेत, तर ठेकेदाराचे ७७ असे एकूण ९७ कर्मचारी सध्या शहरात डेंग्यू नियंत्रणासाठी कार्यरत आहेत.

शहरात ५३ खासगी दवाखान्यातून घेतली जाते माहिती

सध्या शहरात डेंग्यूचे रुग्ण वाढल्याने खासगी दवाखाने फुल्ल झाले आहेत. खासगी दवाखान्यात उपचार घेणाऱ्या रुग्णांची माहिती घेऊन त्यांच्या घरी ॲबेटिंग व फवारणी केली जात आहे. त्यासाठी कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत.

नियंत्रण अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती

शहराचे चार भाग करून प्रत्येक भागासाठी नियंत्रण अधिकारी व कर्मचाऱ्यांचे पथक नियुक्त झाले आहे. त्यानुसार प्रभाग क्रमांक ७ ते १४, १८ व १९ साठी नियंत्रण अधिकारी अतिरिक्त आयुक्त नितीन कापडणीस, सहायक नियंत्रण अधिकारी म्हणून सहायक आयुक्त नारायण सोनार, किशोर सुडके असतील. तसेच पथकप्रमुख सहायक आरोग्य अधिकारी लक्ष्मण पाटील व स्वच्छता निरीक्षक राजेश वसावे असतील. प्रभाग क्रमांक १ ते ५, ६, ८, १५ ते १७ साठी उपायुक्त गणेश गिरी यांची नियंत्रण अधिकारी, सहायक नियंत्रण अधिकारी म्हणून सहायक आयुक्त पल्लवी शिरसाठ, उपलेखापाल बळवंत रनाळकर असतील. पथक प्रमुख सहायक आरोग्य अधिकारी चंद्रकांत जाधव व संदीप मोरे असतील. दोन्ही पथकांच्या नियंत्रणात कनिष्ठ अभियंता, मलेरिया पर्यवेक्षक, संबंधित भागातील मुकादम कार्यरत असतील. अधिकाऱ्यांकडून रोज कामाचा आढावा घेतला जाईल. तसेच प्रभागाची पाहणी करण्यात येणार आहे.

रोज कामांची माहिती देणे सक्तीचे

नियुक्त अधिकारी, ठेकेदार, कर्मचारी यांनी प्रभागातील नगरसेवक, आयुक्त तसेच महापौर यांना अळीनाशक फवारणी, कंटेनर सर्वेक्षण, दूषित कंटेनर रिकामे करणे, फवारणी, डबक्यात गप्पी मासे सोडणे, सेप्टिक टँकच्या पाईपला जाळी बसवणे अशा विविध कामांची माहिती देणे सक्तीचे केले आहे.

महापौरांनी दिली अल्टीमेटम

पावसामुळे नाल्यांमधील पाणी तुंबत असल्याने रस्त्यावर वाहते. त्यामुळे शहरातील सर्व नाल्यांसह नदीचीही स्वच्छता करून ते प्रवाहित करावे, त्यासाठी एका जेसीबीची व्यवस्था करावी, ज्या नाल्यामधील कचरा काढणे शक्य होणार नसेल अशा ठिकाणी औषधी फवारणी करावी, अशा सूचना महापौर प्रदीप कर्पे यांनी देत त्यासाठी १५ दिवसांचे अल्टीमेटम दिले आहेत.

Web Title: Penalty action will be taken if the contractor does not work as per the contract

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.