भरधाव कारने पादचारी अन् दुचाकीस्वारास उडविले, दोन वेगवेगळ्या अपघातांत दोन ठार
By देवेंद्र पाठक | Updated: November 20, 2023 16:05 IST2023-11-20T16:04:12+5:302023-11-20T16:05:00+5:30
या प्रकरणी रविवारी नरडाणा आणि शिरपूर तालुका पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली. पादचारी प्रौढाला उडवले.

भरधाव कारने पादचारी अन् दुचाकीस्वारास उडविले, दोन वेगवेगळ्या अपघातांत दोन ठार
धुळे : शिरपूर तालुक्यातील कमखेडा आणि तेल्यादेव येथे झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातांत दोन जण ठार झाल्याची घटना घडली. या प्रकरणी रविवारी नरडाणा आणि शिरपूर तालुका पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली. पादचारी प्रौढाला उडवले.
मुंबई - आग्रा राष्ट्रीय महामार्गावर शिरपूरकडून धुळ्याकडे कार (क्रमांक एमएच १८ - डब्ल्यू ८३३३) भरधाव वेगाने येत होती. शिरपूर तालुक्यातील कमखेडा फाट्याजवळ कार येताच एका पादचाऱ्यास कारची जोरदार धडक बसली. धडक इतकी जोरात बसली की त्यात दीपक संतोष माळी (वय ४२, रा. वरवाडे, ता. शिरपूर) हे दूरवर फेकले गेले. त्यांच्या डोक्याला आणि हाता-पायाला गंभीर दुखापत झाली. अपघाताची ही घटना रविवारी सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास घडली.
अपघातानंतर कारचालकाने घटनास्थळावरून पळ काढला. जखमी अवस्थेत दीपक माळी यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. गंभीर जखमी झाल्याने रुग्णालयात त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. संतोष फकिरा माळी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नरडाणा पोलिस ठाण्यात रविवारी रात्री १० वाजता फरार कारचालकाविरोधात गुन्हा दाखल झाला. घटनेचा तपास पोलिस उपनिरीक्षक राम दिवे करीत आहेत.
गंभीर तरुणाचा मृत्यू
मुंबई - आग्रा राष्ट्रीय महामार्गावर शिरपूर तालुक्यातील तेल्यादेव येथे एमएच १८ - सीबी ४७६५ क्रमांकाची दुचाकी आणि एमएच ०६ - बीई ७५५२ क्रमांकाची कार यांच्यात अपघात झाला. ही घटना रविवारी सकाळी ७ वाजेच्या सुमारास घडली. या अपघातात प्रशांत संतोष राठोड (वय २३, रा. रोहिणी, ता. शिरपूर) या तरुणाला गंभीर दुखापत झाली. दुचाकीचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. अपघातानंतर कारचालकाने घटनास्थळावरून पळ काढला. जखमी अवस्थेत तरुणाला रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी तपासून मयत घोषित केले. पिंटू मोरसिंग बंजारा (रा. कळमसरे, ता. शिरपूर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. अधिक तपास पोलिस हेड कॉन्स्टेबल सागर ठाकूर करीत आहेत.