धुळ्यात शांतता अबाधितच रहावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2019 10:39 PM2019-07-18T22:39:33+5:302019-07-18T22:40:02+5:30

जिल्हास्तरीय शांतता समिती : मनोगतातून उमटला सूर

Peace in silence should be continued | धुळ्यात शांतता अबाधितच रहावी

धुळ्यात शांतता अबाधितच रहावी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : शहरात शांतता कशी नांदेल यासाठी प्रयत्न करावेत़ सोशल मीडियाचा योग्य वापर करुन चुकीच्या संदेशाकडे दुर्लक्ष करायला हवे़ लोकप्रतिनिधींची देखील भूमिका अधोरेखित झाली पाहीजे़ धुळ्याच्या इतिहासाकडे न डोकावता भविष्याचा विचार करण्याची आवश्यकता आहे़ शहराची शांतता अबाधीत राहण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याची गरज आहे, असा सूर जिल्हास्तरीय शांतता समितीच्या बैठकीत निघाला़ 
शहरातील पोलीस प्रशिक्षण केंद्रातील हॉलमध्ये जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक नाशिक विभागाचे विशेष पोलीस         महानिरीक्षक छेरींग दोर्जे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली़ यावेळी उपस्थितांपैकी काहींनी मनोगत व्यक्त करत शांतता कशी नांदेल यासाठी मत व्यक्त केले़ पोलीस अधीक्षक विश्वास पांढरे, अपर पोलीस    अधीक्षक डॉ़ राजू भुजबळ, प्रांताधिकारी भिमराज दराडे, उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे, श्रीकांत घुमरे, रविंद्र सोनवणे यांच्यासह विविध पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी उपस्थित होते़ यावेळी अनूप अग्रवाल, साबीर शेख, अमीन पटेल, डॉ़ संजय पाटील यांच्यासह अन्य उपस्थित होते़ 
बैठकीत, शंकरराव थोरात, प्राचार्य बाबा हातेकर, वाल्मिक दामोदर, हिरामण गवळी, उमेश चौधरी, शव्वाल  अन्सारी, अ‍ॅड़ प्रसाद देशमुख, आप्पा खताळ यांनी आपले मनोगत व्यक्त केले़ 
सोशल मीडियाचा दिवसेंदिवस वाढणारा वापर-गैरवापर यावर निर्बंध असायला हवे़ बेरोजगारी दूर करण्यासाठी शहरात प्रयत्न हवेत़ पार्किंग समस्या दिवसेंदिवस जटील होत असल्याने त्याचेही नियोजन करावे़ चौपाटीसह संवेदनशील ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरा लावण्यात यावा़ धुळ्यात घडलेल्या इतिहासाची पुनरावृत्ती टाळण्यात यावी़ गो-हत्या आणि लव-जिहाद सारखे विषय गांभिर्याने हाताळण्यात यावेत़ चुकांची पुनरावृत्ती टाळायला हवी़ कायदा हातात न घेता त्याची माहिती पोलिसांना तातडीने द्यावी़ शांतता समितीची बैठक असे न होता यापुढे शांतता संकल्प बैठक म्हणून नवी ओळख व्हावी़ शांतता समितीच्या सदस्यांनी शांततेसाठी प्रयत्न करण्याची गरज आहे़ असे मत यावेळी उपस्थितांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले़ 
पोलीस अधीक्षक विश्वास पांढरे यांनी सर्वत्र शांतता नांदण्याचे आवाहन करत कायद्याचे पालन करण्याचे सांगितले़ सुत्रसंचालन पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांनी केले़ आभार उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे यांनी मानले़ 

कायदा हातात घेतल्यास कारवाईच : दोर्जे
कोणीही कायदा हातात घेवू नये़ कायद्याचा सन्मानच करायला हवा़ एकता, अखंडता अबाधित राहण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत़ सण आणि उत्सव यांची परंपरा लक्षात घेता आपल्यात एकजूट असावी़ या माध्यमातून आपण एकत्र येत असतो, हे विसरु नये़ सोशल मीडियाचा वापर सध्या वेगाने होतो आहे, यातून काय घ्यावे आणि काय घेवू नये आपण ठरवायला हवे़ प्रत्येकाला मेंदू आहे, त्याचा योग्य वापर झाला पाहीजे़ आपण काय करत आहोत, हे कोणाला कळत नसेल या भ्रमात राहू नका़ आमचे बारीक लक्ष आहे हे विसरु नका़ आयुष्याच्या सरतेशेवटी आपण काय केले याचे आत्मपरिक्षण केल्यास आपल्याला पश्चाताप होणार नाही याकडे लक्ष असू द्या़ त्यावेळेस वेळ आपल्या हातातून गेली असेल, हे विसरु नका़ कोणीही कायदा हातात घेवू नका़ चुकीचे वाटत असल्यास पोलिसांना माहिती द्या़ शांतता समितीच्या सदस्यांनी आपली जबाबदारी योग्य रितीने पार पाडण्यासाठी प्रयत्न करावेत़ कोणी कायदा हातात घेतल्यास त्याची गय केली जाणार नाही़ जात-पात, धर्म न पाहता त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असे विशेष पोलीस महानिरीक्षक छेरींग दोर्जे यांनी सांगितले़ 

Web Title: Peace in silence should be continued

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.