जिल्ह्यातील दोन गावांमध्येच रुग्ण; इतर सर्व गावे कोरोनामुक्त !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:42 IST2021-08-18T04:42:54+5:302021-08-18T04:42:54+5:30
धुळे : जिल्ह्यात सध्या केवळ तीन सक्रिय कोरोनाबाधित रुग्ण आहेत. त्यात, धुळे शहर, धुळे तालुका व शिरपूर तालुक्यातील प्रत्येकी ...

जिल्ह्यातील दोन गावांमध्येच रुग्ण; इतर सर्व गावे कोरोनामुक्त !
धुळे : जिल्ह्यात सध्या केवळ तीन सक्रिय कोरोनाबाधित रुग्ण आहेत. त्यात, धुळे शहर, धुळे तालुका व शिरपूर तालुक्यातील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. साक्री व शिंदखेडा तालुक्यातील सक्रिय रुग्णांची संख्या शून्यावर आली आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव कमी झाला आहे. धुळे शहर कोरोनामुक्त होणारे राज्यातील पहिले शहर ठरले होते. त्यापाठोपाठ धुळे जिल्ह्यातील सक्रिय रुग्णांची संख्या शून्यावर आली होती. कोरोनाचा एकही रुग्ण नसलेला धुळे राज्यातील पहिला जिल्हा ठरला होता. मात्र, कोरोनामुक्तीचा आनंद जास्त काळ टिकू शकला नाही. कोरोनामुक्त झाल्यानंतर दोन दिवसातच पुन्हा दोन कोरोनाबाधित रुग्ण आढळले होते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी आणखी एक कोरोनाबाधित रुग्ण आढळून आला होता. सध्या जिल्ह्यात तीन सक्रिय रुग्ण आहेत. धुळे शहरात एक रुग्ण आहे. तसेच धुळे तालुक्यातील मोराने व शिरपूर तालुक्यातील मांजरोद येथील एका रुग्णावर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यातील ही दोन गावेवगळता इतर गावांमध्ये कोरोनाचा एकही रुग्ण नाही. नुकतेच आढळलेले तिन्ही रुग्ण इतर जिल्ह्यातून प्रवास करून आल्याची माहिती मिळाली.
दररोज दीड हजार चाचण्या
कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी झाली असली तरी कोरोना चाचण्या नियमितपणे केल्या जात आहेत. दररोज एक हजार २०० ते एक हजार ५०० कोरोना चाचण्या होत आहेत. यात अँटिजेन व आरटीपीसीआर चाचण्यांचा समावेश आहे.
जिल्ह्यातील कोरोनामुक्त गावे
तालुका - धुळे
गावे- कापडणे, नेर, कुसुंबा
तालुका- शिरपूर
गावे- बोराडी, वाडी, तऱ्हाडी
तालुका- शिंदखेडा
गावे- दोंडाईचा, नरडाणा, चिमठाणे
तालुका- साक्री
गावे- पिंपळनेर, कासारे, निजामपूर
सावधान, या गावात पॉझिटिव्ह
तालुका- धुळे
गाव- मोराणे
तालुका- शिरपूर
गावे मांजरोद