पॅसेंजर व खान्देश एक्सप्रेस सुरु होण्याची प्रवाशांना प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2020 11:46 IST2020-12-14T11:46:02+5:302020-12-14T11:46:17+5:30
नेहमी गजबज असलेल्या दोंडाईचा रेल्वे स्थानकात शुकशुकाट

dhule
दोंडाईचा : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी दोंडाईच्यासह राज्यात २२ मार्चपासून प्रवाशी रेल्वे बंद आहेत. दोंडाईचा रेल्वे स्थानकावर लांब पल्ल्याच्या फक्त तीनच गाड्या थांबत आहेत. इतर गाड्या व खाद्यपदार्थांचे स्टॉल बंद असल्याने स्थानकात शुकशुकाट दिसून येत आहे. प्रवाशांना पॅसेंजर, खान्देश एक्सप्रेस सुरु होण्याची प्रतीक्षा लागून आहे.
सुरत-भुसावळ रेल्वे मार्गावरील दोंडाईचा रेल्वे स्थानकावर आठवड्यात पॅसेंजरसह लांब पल्ल्याच्या सुमारे ४० गाड्या धावतात. सद्यस्थितीत या प्रवाशी गाड्यांपैकी फक्त हावरा-अमदाबाद, छापरा-सुरत या लांब पल्ल्याच्या गाड्या दोंडाईचा स्टेशनवर थांबतात. सुरत-भुसावळ -सुरत, अमरावती पॅसेंजर, खान्देश एक्सप्रेस आदी सर्व प्रवाशी रेल्वे बंदच आहेत. त्यामुळे स्थानकात शुकशुकाट दिसून येत आहे. या भागातील प्रवाशांना या बंद असलेल्या सर्व प्रवाशी गाड्या सोयीस्कर आहेत.
पूर्वी सर्वच प्रवाशी गाड्या सुरू असल्याने दोंडाईचा रेल्वे स्टेशनवर प्रवाशाची मोठी वर्दळ असायची. स्टेशनवर विविध कॅन्टीन आहेत. रेल्वेमुळे विविध किरकोळ विक्रेत्यांना रोजगार मिळत होता. स्टेशनवरुन प्रवाशांची ने-आण करणाऱ्या रिक्षा, टेम्पो चालकांना रोजगार होता. सुमारे २०० अकुशल कारागिरांना रोजगार मिळाला होता. परंतू सद्यस्थितीत दोनच लांब पल्ल्याच्या प्रवाशी गाड्या सुरू असून लोकल सर्वच गाड्या बंद आहेत. खान्देशातून फक्त १४० रुपयात मुंबई येथे जाता येणारी खान्देश एक्सप्रेस बंद असल्याने प्रवाशांना ६०० ते ७०० रुपये खर्चून ट्रॅव्हल्सने मुंबईला जावे लागते. रेल्वेने फक्त ३० रुपयात सुरत जाता येते, तेथे आता बसने २०० रुपये मोजावे लागत आहेत. बसेस, ट्रॅव्हल्सचे उत्पन्न वाढले असले तरी दोंडाईचा रेल्वे स्टेशनवरील वर्दळ कमी झाल्याने विविध विक्रेत्यांचा रोजगार ठप्प झाला आहे.