भूमिगत गटारींमुळे मनपासह पक्ष बदनाम, अन्यथा ठोस निर्णय घेणार : सभापती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 04:36 IST2021-05-12T04:36:59+5:302021-05-12T04:36:59+5:30
देवपूर भागात भूमिगत गटारी आणि त्यासाठी खोदून ठेवलेले रस्ते आणि त्याच्या दुरुस्तीकडे होत असलेले दुर्लक्ष या विविध संदर्भात महाराष्ट्र ...

भूमिगत गटारींमुळे मनपासह पक्ष बदनाम, अन्यथा ठोस निर्णय घेणार : सभापती
देवपूर भागात भूमिगत गटारी आणि त्यासाठी खोदून ठेवलेले रस्ते आणि त्याच्या दुरुस्तीकडे होत असलेले दुर्लक्ष या विविध संदर्भात महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि महापालिका यांची संयुक्त बैठक महापालिकेच्या सभागृहात दुपारी पार पडली. यावेळी महापौर चंद्रकांत सोनार, स्थायी समिती सभापती संजय जाधव, आयुक्त अजिज शेख, भाजपचे महानगराध्यक्ष अनुप अग्रवाल, एमजीपीचे निकम यांच्यासह ठेकेदारांचे प्रतिनिधी तसेच देवपूर भागातील नगरसेवक, नगरसेविका उपस्थित होते.
बैठकीपूर्वीच भरला दम
बैठक सुरू होण्यापूर्वी प्रास्ताविकांतून स्थायी समिती सभापती संजय जाधव यांनी एमजीपीच्या अधिकाऱ्यांसह ठेकेदाराच्या कामांवर नाराजी व्यक्त करीत सज्जड इशारा देत त्यांना चांगलाच दम भरला. गेल्या दीड वर्षापासून भूमिगत गटारीचे काम सुरू असून, ते संथपणे सुरू आहे. रस्त्यांची पूर्णपणे वाट लागली असून, अतिशय बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. काम पुढे सरकत नाही, परिणामी देवपूर भागातील नगरसेवकांना नागरिकांचा रोष पत्कारावा लागत आहे. असेच सुरू राहिले तर कठीण असून, तात्काळ उपाययोजना करावी, रस्ते दुुरुस्त करावेत. अन्यथा स्थायी समितीच्या माध्यमातून ठोस निर्णय घ्यावा लागेल, असा सज्जड दम स्थायी समिती सभापती संजय जाधव यांनी दिला.
पावसाळ्यापूर्वी काम करा
भूमिगत गटारीचे एकूण काम किती, त्यातील किती काम मार्गी लागले, किती बाकी आहे, ते का बाकी आहे, वर्क ऑर्डरप्रमाणे काम सुरू आहे, नसेल तर अडचणी काय, अवघ्या पंधरा दिवसांवर पाऊस आला असता आपल्याकडे कामांचे नियोजन काय, एमजीपी आणि ठेकेदाराचे किती अभियंते यावर देखरेख करीत आहेत. असे वेगवेगळे प्रश्न विचारून अनुप अग्रवाल यांनी एमजीपी आणि ठेकेदाराच्या प्रतिनिधीला धारेवर धरत निरुत्तर केले. मातीने गटारी बुजल्या गेल्या आहेत, महापालिकेचे रस्ते खराब झाले आहेत़ ते तात्काळ दुरुस्त झाले पाहीजे़ यासाठी एक संयुक्त समिती स्थापन करावी़ लवकरात लवकर अभियंते नियुक्त करून त्यांचा संपर्क क्रमांक नगरसेवकांकडे देण्याचा सल्लाही अग्रवाल यांनी दिला. स्थानिक आमदाराचा हस्तक्षेप?
देवपुरातील जयहिंद कॉलनी परिसरात भूमिगत गटारीमुळे रस्त्यांची वाट लागली आहे. मोठमोठे खड्डे खोदून ठेवले असून, काम अर्धवट सोडून दिले आहे की काय, अशी स्थिती आहे. वारंवार सांगूनही दुर्लक्ष केले जाते. हे काम मार्गी लागू नये यासाठी आमदार डॉ. फारुक शहा यांच्याकडून एमजीपीच्या अधिकाऱ्यांवर दबाव टाकला जात असल्याचा आरोप नगरसेविका प्रतिभा चौधरी यांनी सभागृहात केला. त्यांनी शंका उपस्थित करीत एमजीपीच्या अधिकाऱ्यांवर प्रश्नांची सरबत्ती केली. त्यानंतर अधिकाऱ्यांनीही प्रतिभा चौधरींच्या आरोपांचे खंडन करीत त्यात काही तथ्य नसल्याचे स्पष्ट केले.
कामांसंदर्भात सर्वांचीच नाराजी
भूमिगत गटारीचे काम जवळपास थांबविण्यात आल्याची स्थिती आहे. रस्त्यावर खड्डे असून, मातीने गटारी तुंबल्या आहेत. अधिकारी येत नाही, ठेकेदाराचा कोणताही पत्ता नाही. नागरिकांच्या तक्रारी वाढत असून, त्यांचा रोष पत्कारावा लागतो. महापालिकेसह भाजप पक्ष बदनाम होत आहे. फोन लागत नाही आणि लागला तर अधिकारी घेत नाही. कोट्यवधी रुपयांच्या चांगल्या योजनेचे आता अक्षरश: तीन-तेरा वाजविले जात आहे, अशी नाराजी आणि दु:ख नगरसेवकांनी व्यक्त केले.