जिल्हा युवा संसदेत २४ स्पर्धकांचा सहभाग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2021 21:53 IST2021-01-02T21:53:05+5:302021-01-02T21:53:24+5:30
नेहरु युवा केंद्र : अनिकेत वाकळे प्रथम

जिल्हा युवा संसदेत २४ स्पर्धकांचा सहभाग
धुळे : भारत सरकारच्या युवा कार्यक्रम व खेळ मंत्रालय अंतर्गत कार्यरत असलेल्या नेहरु युवा केंद्र धुळे आणि राष्ट्रीय सेवा योजना युनिट धुळे जिल्हा यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा युवा संसद प्रतियोगिता ऑनलाईन पध्दतीने नुकतीच पार पडली.
या स्पर्धेसाठी नवीन शैक्षणिक धोरण भारतातील शिक्षण क्षेत्रात परिवर्तन आणेल, उन्नत भारत अभियान, नवीन सामान्य स्थितीत ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देणे, शुन्य बजेट नैसर्गिक शेती शेतकर्यांसाठी वरदानच आहे हे चार विषय देण्यात आले होते.
अत्यंत चुरशीच्या झालेल्या या प्रतियोगितेत अनिकेत रविंद्र वाकळे याने प्रथम तर जितेंद्र धीरसिंग राठोड याने द्वितीय क्रमांक पटकावला. या दोघा विजेत्यांची राज्यस्तरीय युवा संसद प्रतियोगितासाठी निवड झाली आहे.
प्रतियोगितेचे संयोजन आणि सूत्रसंचलन नेहरु युवा केंद्राचे धुळे जिल्हा युवा समन्वयक अशोक कुमार मेघवाल आणि राष्ट्रीय सेवा योजनेचे धुळे जिल्हा नोडल अधिकारी तथा झेड. बी. पाटील महाविद्यालयाचे एनएसएस कार्यक्रम अधिकारी प्रा. डाॅ. प्रशांत कसबे यांनी केले. सेवानिवृत्त प्राचार्य डाॅ. एस. एस. नंदन, प्रा. अनिल चव्हाण, अजय भदाणे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्षा ज्योती पावरा, सचिन बागुल यांनी स्पर्धेचे परीक्षण केले. लेखापाल नाना पाटील, राष्ट्रीय युवा स्वयंसेवक उमा बागुल, आनंद पाटील, राहुल गोपाळ यांनी परिश्रम घेतले.