सोनगीर येथे पालखी सोहळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2020 12:37 IST2020-03-13T12:37:21+5:302020-03-13T12:37:44+5:30
संत तुकाराम बीज : मोफत मोतीबिंदू तपासणी शिबिरासह विविध उपक्रम

dhule
लोकमत न्यूज नेटवर्क
सोनगीर : येथील पाटील समाजाच्या वतीने संत तुकाराम महाराज बीज उत्सवानिमित्त गावातून पालखी मिरवणूक काढण्यात आली. तसेच गरजू रुग्णांसाठी मोफत मोतीबिंदू तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यासह विविध उपक्रमांनी तुकाराम बीज उत्साहात साजरा करण्यात आला.
संत तुकाराम बीज उत्सवानिमित्त नंदुरबार येथील कांतालक्ष्मी हॉस्पिटलच्या संयुक्त विद्यमाने गावातील गरजू रुग्णांसाठी मोफत मोतीबिंदू तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.
सकाळी ९ वाजता संत तुकाराम महाराज यांच्या प्रतिमेस डॉ.प्रकाश कोळी, डॉ.अजय सोनवणे, समाजाचे अध्यक्ष संजय पाटील यांच्याहस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. शिबिरात ३७ रुग्णांची तपासणी करण्यात आली. यात १८ रुग्णांवर पुढील शस्त्रक्रिया नंदुरबार येथे करण्यात येणार आहे.
सायंकाळी ६ वाजेपासून संत तुकाराम महाराज यांच्या पालखी मिरवणूकीला गावातील पाटील गल्लीपासून प्रारंभ झाला. प्रथम संत तुकाराम महाराज यांची महाआरती करण्यात आली. ही मिरवणूक गावातील गुजर गल्ली, परदेशी गल्ली, गांधी चौक, ग्रामपंचायत चौक, बागुल गल्ली, बजरंग चौक या प्रमुख मार्गाने काढण्यात आली. पाटील गल्लीत पालखी मिरवणुकीची सांगता झाली. यानंतर रात्री ९ वाजता ह.भ.प. सोमनाथ महाराज (आळंदीकर) यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम झाला. याप्रसंगी पाटील समाज अध्यक्ष संजय पाटील, उपाध्यक्ष जगदीश पाटील, माजी ग्रामपंचायत सदस्य हरिश्चंद्र पाटील, एकनाथ पाटील, जितेंद्र पाटील, समाधान पाटील, सोनल पाटील, रोहित पाटील, सावकार पाटील, रोहिदास पाटील, गोरख पाटील, नाना पाटील, परशुराम पाटील, आधार पाटील, रोहित पाटील, भिकन पाटील, जगदीश हिरामण पाटील, तुषार पाटील आदी उपस्थित होते.