नेर परिसरातून सहा महिन्यांमध्ये २०० वर जलपरी चोरीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:39 IST2021-09-21T04:39:55+5:302021-09-21T04:39:55+5:30
नेर येथील शेतकरी भाजीपालासह कापूस, कांदे, मका, बाजरी, भुईमूग ही नगदी पिके घेतात. दोन वर्षांपासून कोरोनाने सर्वांचीच आर्थिक ...

नेर परिसरातून सहा महिन्यांमध्ये २०० वर जलपरी चोरीस
नेर येथील शेतकरी भाजीपालासह कापूस, कांदे, मका, बाजरी, भुईमूग ही नगदी पिके घेतात. दोन वर्षांपासून कोरोनाने सर्वांचीच आर्थिक घडी विस्कटली असली तरी त्यात शेतकऱ्यांचे अधिक नुकसान झाले आहे. यंदा सुरुवातीपासूनच पाऊस कमी होता. त्यानंतर अधिक पाऊस झाला. यामुळे पिकांचे नुकसान झाले आहे. त्यात आता नेर परिसरातील शेतकऱ्यांच्या विहिरीवरील इलेक्ट्रिक मोटार पंप जलपरी चोरण्याचे सत्र सुरू आहे. कानडामाना शिवारातून जी. एन. पाटील यांची तसेच दिनकर सोनवणे यांची महाल काळी शिवारातून, शिवाजी चौधरी यांची नूरनगर शिवारातून, सुरेश रामदास अहिरे यांची तर, सलग दोन ते तीन वर्षांपासून सहा वीजपंप, राकेश जयस्वाल यांच्यासह एका शेतकऱ्याची जलपरी मोटार लोणखेडी शिवारातून चोरीस गेली आहे. गेल्या सहा महिन्यांत २०० वर जलपरी व कृषीपंप चोरीस गेले आहेत.
मोटारचोरीची टोळीची शक्यता
खरीप हंगामात पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. उत्पादन खर्चही निघेनासा झाला आहे. त्यातल्या त्यात वीज मोटारी चोरांच्या टोळीने धुमाकूळ घातला आहे. विशेष म्हणजे नेर सुरत, नागपुर महामार्गालगच्या वर्दळीच्या शेतातूनही वीज मोटारी चोरी होत असल्याने चोरट्यांना कोणाचाच धाक राहिला नसल्याचे दिसून येत आहे.
पोलिसांकडून फिर्याद घेण्यास टाळाटाळ
ज्या शेतकऱ्यांची मोटार चोरी जात आहे, त्यांच्याकडे त्या मोटारीचे बिल सापडत नाही. म्हणून पोलिसांकडे फिर्याद देण्यासाठी गेल्यास त्या शेतकऱ्यांकडे आधी बिलाची मागणी केली जाते. कायद्यानुसार हे योग्य असले तरी दोन ते चार वर्षांपूर्वी घेतलेल्या मोटारीचे बिल शेतकरी सांभाळू शकत नाही. त्यामुळे ते फिर्याद देताना बिल देऊ शकत नाही. या तांत्रिक अडचणीमुळे अनेक शेतकरी पोलिसांपर्यंत जात नाही.
शेतकऱ्यांच्या तक्रारीवरून मोटार चोरीचा गुन्हा दाखल केल्यास शेतकऱ्यांना दिलासा मिळेल. तसेच पोलिसांनी प्रामाणिकपणे तपास केल्यास इलेक्ट्रिक मोटार चोरीला निश्चितच आळा बसेल, असा विश्वास आनंद पाटील, योगेश गवळे, डाॅ. सतीश बोढरे यांनी व्यक्त केला आहे.