घराचा मागील दरवाजा उघडून चार लाखाचे दागिने लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2019 22:10 IST2019-06-04T22:09:29+5:302019-06-04T22:10:15+5:30
शिरपुरातील घटना : भावाकडे आलेल्या बहिणीला चोरट्यांचा हिसका

dhule
शिरपूर : शहरातील करवंद नाक्याजवळील शंकर पांडू नगरातील एका घराचा मागील दरवाजा उघडून चोरट्यांनी सुमारे ४ लाख रूपये किंमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना घडली़ याबाबत शिरपूर पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे़ भावाकडे आलेल्या बहिणीचे सोन्याचे दागिने चोरीस गेल्याने खळबळ उडाली आहे.
ही घटना ३१ मेची रात्र ते १ जूनच्या पहाटे ६़३० वाजेच्या दरम्यान घडली़ येथील वीज महावितरण कंपनीचे आॅपरेटर किशोर शिरसाठ हे प्लॉट नंबर २१ शंकर पांडू नगरात राहतात़ त्यांच्याकडे त्यांची बहिण सरला सुकदेव शिंदे (३३) रा़चांदीका आक्का कॉलनी, यावल रोड, चोपडा ही पती व मुलांसह २६ तारखेला एका साखरपूडा समारंभासाठी आले होते़ त्यानंतर ते त्याच दिवशी रात्री कोकणात फिरण्यासाठी शिंदे व त्यांचे आप्तजण असे दोन परिवारासह रवाना झाले. ते फिरून आल्यानंतर पुन्हा ३० मे रोजी शिंदे कुटुंबिय शिरपूरला आले़ सुट्टी असल्यामुळे ते गावी न जाता येथेच थांबले़
३१ रोजी किशोर शिरसाठ हे ड्यूटीवर गेल्यानंतर रात्री शिंदे कुटुंबिय घराच्या गच्चीवर तर शिरसाठ कुटुंबिय घराच्या पहिल्या हॉलमध्ये झोपले होते़ दरम्यान अज्ञात चोरट्याने घराचा मागील दरवाजा उघडून घरात प्रवेश मिळविला़ किचन रूममधील ठेवलेल्या एका कपाटातील डब्यामधून चोरट्याने सोन्याचे दागिने चोरून नेले. त्यात ५ तोळे वजनाचा चपला हार, २ सोन्याचे नेकलेस, २ सोन्याच्या बांगड्या, अडीच तोळे वजनाच्या, ५ ग्रॅमचे कानातले, ३ ग्रॅम सोन्याचे रिंगा, १० ग्रॅम वजनाचे ३ सोन्याच्या अंगठ्या, ३ ग्रॅम वजनाच्या ३ सोन्याचे पदक, १० ग्रॅम वजनाचे सोन्याचे तुकडे असा एकूण ३ लाख ७९ हजार ५०० रूपयांच्या ऐवजाचा समावेश आहे.
किशोर शिरसाठ यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरोधात घरफोडीचा गुन्हा नोंदविण्यात आला असून तपास पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत करीत आहेत़