जिल्ह्यात केवळ १७० शाळाबाह्य मुले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 04:36 IST2021-03-26T04:36:22+5:302021-03-26T04:36:22+5:30

धुळे : जिल्ह्यात नुकतीच शाळाबाह्य मुलांची शोधमोहीम राबविण्यात आली. १ मार्च ते १० मार्च या दहा दिवसांच्या कालावधीत ...

Only 170 out-of-school children in the district | जिल्ह्यात केवळ १७० शाळाबाह्य मुले

जिल्ह्यात केवळ १७० शाळाबाह्य मुले

धुळे : जिल्ह्यात नुकतीच शाळाबाह्य मुलांची शोधमोहीम राबविण्यात आली. १ मार्च ते १० मार्च या दहा दिवसांच्या कालावधीत ही शोधमोहीम पार पडली. जिल्ह्यात एकूण १७० शाळाबाह्य मुले शोधमोहिमेत आढळली आहेत. धुळे तालुक्यात सर्वाधिक ८१ मुले आढळली आहेत, तर शिंदखेडा तालुक्यात एकही शाळाबाह्य मुलगा किंवा मुलगी आढळली नाही.

ज्यांनी शाळेत प्रवेश घेतलेला नाही किंवा ज्यांनी प्रवेश घेतला होता. मात्र प्राथमिक शिक्षण पूर्ण केले नाही असे सहा ते चौदा या वयोगटातील बालकांचा शोधमोहिमेत शोध घेण्यात आला. शिक्षणाच्या प्रक्रियेत कधीच न आलेली तसेच शाळेत नाव दाखल झाले व सतत एक महिना अनुपस्थित आहेत अशा ६ ते १४ वयोगटातील मुलांचा समावेश शाळाबाह्य मुलांमध्ये होतो.

शाळेत कधीच नाव दाखल झालेले नाही अशी १५५ मुले सर्वेक्षणात आढळली, तर शाळेत नाव दाखल झाले आहे. मात्र सतत ३० पेक्षा जास्त दिवस अनुपस्थित आहेत असे १५ मुले आढळली. शाळाबाह्य मुलांमध्ये ८६ मुली व ८४ मुलांचा समावेश आहे. शाळाबाह्य मुलांना नजीकच्या शाळेत दाखल केले जाणार आहे. दरम्यान, अनेक ठिकाणी बालकामगार काम करत असल्याचे दिसते. मात्र सर्वेक्षणात एकही बालकामगार आढळला नसल्याचे सांगितले आहे.

५० टक्क्यांपेक्षा अधिक मुली शाळाबाह्य -

शाळाबाह्य मुलांच्या शोधमोहिमेत ५०.५८ टक्के मुली आढळल्या आहेत. एकूण १७० बालकांमध्ये ८६ मुले, तर ८४ मुलांचा समावेश आहे. शिरपूर तालुक्यात सर्वाधिक ४८ शाळाबाह्य मुली आहेत. त्यानंतर धुळे तालुक्यात ३३ व साक्री तालुक्यात ५ शाळाबाह्य मुली आढळल्या, तर शिंदखेडा तालुक्यात एकही मुलगी आढळली नाही.

मोहिमेत मुख्याध्यापक सहभागी -

१ ते १० मार्च या कालावधीत शाळाबाह्य मुलांची शोधमोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत मुख्याध्यापक व स्थानिक कर्मचारी सहभागी झाले होते. शिंदखेडा तालुक्यात एकही शाळाबाह्य बालक आढळला नसल्याचे म्हटले आहे. तसेच साक्री तालुक्यात मोठ्या प्रमाणावर स्थलांतर होते तरीही तेथे केवळ ११ शाळाबाह्य बालके आढळली आहेत.

प्रतिक्रिया -

जिल्ह्यातील चारही तालुक्यात शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण करण्यात आले. शिरपूर तालुक्यात सर्वाधिक शाळाबाह्य मुले आढळली आहेत. स्थलांतर जास्त होत असल्यामुळे तेथे जास्त शाळाबाह्य मुले आढळली असण्याची शक्यता आहे. मुख्याध्यापक व स्थानिक कर्मचाऱ्यांच्या मदतीने शोधमोहीम पार पडली.

Web Title: Only 170 out-of-school children in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.