टायर फुटल्याने कांद्याचा ट्रक उलटला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2021 04:30 IST2021-05-03T04:30:48+5:302021-05-03T04:30:48+5:30
२ मे रोजी पहाटे तीन ते साडेतीन वाजण्याच्या सुमारास महामार्गावरील सावळदे पुलाजवळ ही घटना घडली़ पिंपळगाव-नाशिक येथून ट्रक (आऱजे़-११- ...

टायर फुटल्याने कांद्याचा ट्रक उलटला
२ मे रोजी पहाटे तीन ते साडेतीन वाजण्याच्या सुमारास महामार्गावरील सावळदे पुलाजवळ ही घटना घडली़
पिंपळगाव-नाशिक येथून ट्रक (आऱजे़-११- जी़बी़- ५८९० ) मध्ये ३० टन कांदा भरून कानपूर येथे जाण्यासाठी निघाला होता़ मार्गावरील तापी नदी पूल ओलांडून ट्रक येत असताना अचानक गाडीचे दोन्ही टायर फुटल्याने चालक राजेश रावत (रा़सिप्री उत्तर प्रदेश) याचे ट्रकवरील नियंत्रण सुटल्याने सरळ पुलाचे कठडे तोडत ये-जा करणाऱ्या दोन्ही पुलांच्या मध्यभागी असलेला ८ ते १० फुटांच्या खड्ड्यात जाऊन आदळला़ त्यामुळे गाडीचे पूर्णत: नुकसान होऊन गाडीतील कांद्याच्या गोण्या इतरत्र विखरून पडल्या. अंधार असल्यामुळे जेमतेम चालक रावत व सहचालक हे दोन्ही कसेबसे बाहेर पडून रस्त्यावर आलेत़ त्यानंतर त्यांनी घडलेला प्रकार जवळील हॉटेल चालकांना सांगितला़
घटनेची माहिती वाऱ्यासारखी जवळील सावळदे येथील ग्रामस्थांना कळल्यानंतर त्यांनी घटनास्थळी गर्दी करून मिळेल त्या कांद्याने भरलेल्या गोण्या वाहून नेल्या.
सुदैवाने तापी नदी पूल ओलांडल्यानंतर ही घटना घडल्यामुळे मोठा अपघात टळला, अन्यथा ही ट्रकसुद्धा पाण्यात पडला असता. या अपघातात चालक व सहचालक किरकोळ जखमी झाले आहेत़
वाहने पाण्यातच पडूऩ़़
२८ ऑगस्ट २०२० रोजी पहाटेच्या सुमारास चालकाला डुलकी लागल्यामुळे पुलाचे कठडे तोडत ट्रक पाण्यात पडला होता़ अद्यापही त्या वाहनांचा शोध लागलेला नाही़ सुरुवातीला खासगी आराम बस पाण्यात पडल्याची वार्ता पसारताच प्रशासनदेखील दचकले़ त्यामुळे प्रशासनाने तातडीने राज्य आपत्ती दलाला पाठवून शोध घेण्यास कळविले़ मात्र, त्यानंतर ते वाहन ट्रक असल्याचे कळताच त्यानंतर शोध घेण्यास त्यांनीसुद्धा दुर्लक्ष केले़ तेव्हापासून ते वाहन अद्यापही पाण्यातच आहे़
२० जून २०२० रोजी दुपारच्या सुमारास एका ट्रकचे टायर फुटल्यामुळे सावळदे गावाजवळील तापी नदीपात्रात जाऊन बुडाला होता़ दरम्यान, दुसऱ्या दिवशी चालकाचा मृतदेह मिळून आला होता. मात्र तेव्हापासून तो तांदळाने भरलेला ट्रॅक अद्यापही पाण्यातून बाहेर काढलेला नाही़ या घटनेला आज १० महिने उलटूनही हा ट्रक यंत्रसामुग्रीअभावी बाहेर काढण्यात आलेला नाही हे विशेष़
९ फेब्रुवारी २०१५ रोजीच्या भल्या पहाटे दोन वाहने तापी नदीपात्रात पडली; मात्र त्या दोघांना पाण्यात पोहता येत असल्यामुळे त्यांचा जीव वाचला होता़
२०१४ मध्येदेखील लोखंडी भंगाराचा ट्रक पाण्यात पडला होता़
१६ नोव्हेंबर २००९ रोजी रात्री १० वाजण्याच्या सुमारास शिरपूरकडून धुळ्याकडे जाणारा टीव्ही व इलेक्ट्रॉनिक्स साहित्य घेऊन जाणारा कंटनेर पुलाचे कठडे तोडून पाण्यात पडला होता़ कंटेनर हा गाजियाबादहून औरंगाबाद येथे व्हिडिओकॉन कंपनीचे टीव्ही पिक्चर टयूब घेऊन जाण्यासाठी निघाला होता़ प्रशासनाने दोन दिवस प्रयत्न करूनही तो कंटेनर बाहेर काढण्यात आला नव्हता़ १८ नोव्हेंबर रोजी ट्रकमध्ये मामा-भाचा यांना जलसमाधी मिळाल्याचे वृत्त निश्चित झाले़ १९ रोजी पाण्यात पडलेला कंटनेर पुणे येथील सीआरपीएफ पथकासह सावळदे येथील स्थानिक पोहणाऱ्यांच्या मदतीने बाहेर काढण्यात आला़ त्यावेळी मामा-भाचा या दोघे कॅबीनमध्येच अडकल्याचे मिळून आले होते़