धुळे तालुक्यातील नेर येथून गावठी कट्टा व चार जिवंत काडतुसांसह एकास अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 12:53 IST2021-02-24T12:52:25+5:302021-02-24T12:53:36+5:30
धुळे तालुका पोलिसांची कारवाई

धुळे तालुक्यातील नेर येथून गावठी कट्टा व चार जिवंत काडतुसांसह एकास अटक
धुळे : तालुक्यातील नेर येथून एका घरातून देशी बनावटीचा गावठी कट्टा, चार जिवंत काडतुसे व एक छऱ्याची एअर बंदूक असा एकूण २२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, या प्रकरणी एका तरुणास अटक करण्यात आली आहे. ही कारवाई धुळे तालुका पोलिसांनी केली. धुळे तालुका पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक गजानन गोटे यांना नेर येथील एका तरुणाच्या घरात बेकायदेशीर देशी बनावटीचा गावठी कट्टा असल्याची गुप्त माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी नेर येथे जाऊन पंकज उर्फ सागर बाजीराव चाैधरी (२०, रा. बाजारपट्टा, नेर) याच्या घराची झडती घेतली. घरात १५ हजार रुपये किमतीचा गावठी कट्टा, २ हजार रुपये किमतीची चार जिवंत काडतुसे तसेच ५ हजार रुपये किमतीची एक छऱ्याची बंदूक असा एकूण २२ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल आढळून आला. या प्रकरणी पंकज चौधरी या तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यास अटक करण्यात आली आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सागर काळे, विजया पवार, प्रवीण पाटील, चेतन चव्हाण, धीरज सांगळे, राकेश महाले, कुमावत यांनी केली आहे.