हरविलेले पैसे मिळताच वृध्द खूश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2020 21:45 IST2020-08-07T21:45:15+5:302020-08-07T21:45:56+5:30
आझादनगर पोलीस : पिशवी मिळाली फळ विक्रेत्या महिलेकडे

हरविलेले पैसे मिळताच वृध्द खूश
धुळे : बँकेतून पैसे काढल्यानंतर दुचाकीला लावलेली पिशवी वृध्दाकडून गहाळ झाली़ त्यांनी आझादनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करताच तपासाची सुत्रे फिरवून अवघ्या काही वेळातच त्या वृध्दाला त्याची पिशवी आणि त्यात असलेले ९ हजार रुपये मिळताच चेहऱ्यावर समाधान उमटले़ त्यांनी पोलिसांचे कौतुक तर केलेच शिवाय त्या फळ विक्रेत्या महिलेला १०० रुपये बक्षिस म्हणून दिले़ हा प्रकार शुक्रवारी दुपारी पाटबाजार परिसरात घडला़
शहरातील शिवप्रताप कॉलनीत राहणारे रमेश धोंडू पाटील (६७) हे मॅफको महामंडळात नोकरीला होते़ ते सेवानिवृत्त झालेले आहेत़ दरमहा केवळ हजार रुपये इतकी पेन्शन त्यांना मिळते़ गेल्या ९ महिन्याची पेन्शन घेण्यासाठी ते पाटबाजारातील बँक आॅफ इंडियामध्ये गेले़ पेन्शनेचे ९ हजार रुपये बँक खात्यातून काढून पिशवीत टाकले़ पिशवी दुचाकीला लावली़ मात्र घराकडे निघत असतानाच पिशवी नसल्याचे त्यांच्या लक्षात येताच शोधाशोध केली़ पण, त्याचा काही उपयोग झाला नाही़ त्यांनी आझादनगर पोलीस ठाणे गाठले आणि पैसे गहाळ झाल्याची तक्रार नोंदविताच पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली बिट मार्शलचे कर्मचारी किरण वळवी आणि हेड कॉन्स्टेबल गवळे यांना पाटील यांच्या सोबत पाठविले़ पाटील हे कोणत्या रस्त्याने आले, तो परिसर पिंजून काढण्यात आला़ फळे विकणाºया वृध्द महिलेकडे विचारणा केल्यानंतर ती पिशवी तिच्याकडे असल्याचे सांगितले़ ती पिशवी सुपुर्द करण्यात आली़