धुळे जिल्ह्यात टॅँकरची संख्या ४३वर पोहचली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2019 11:56 IST2019-05-25T11:56:08+5:302019-05-25T11:56:56+5:30
जुन अखेरपर्यंत टँकरने करावा लागणार पाणीपुरवठा, १६४ गावांसाठी विहिर अधिग्रहित

धुळे जिल्ह्यात टॅँकरची संख्या ४३वर पोहचली
आॅनलाइन लोकमत
धुळे : गेल्या काही महिन्यांपासून पाणी टंचाईचे संकट गडद झालेले आहे. गावातील विहीरींनी तळ गाठल्याने, अनेक गावांची मदार आता पाण्याच्या टॅँकरवरच अवलंबून राहिलेली आहे. यावर्षी प्रथमच टॅँकराची संख्या वाढलेली आहे. आजच्या स्थितीत जिल्ह्यातील ५९ गावांना ४३ टॅँकरांनी पाणी पुरवठा केला आहे. तर १६४ गावांसाठी विहिर अधिग्रहित करण्यात आलेल्या आहते. असलेले जलस्त्रोत आटल्यास येत्या काही दिवसात अजून टॅँकरची संख्या वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
गेल्या काही वर्षांपासून जिल्ह्यात पावसाचे प्रमाण कमी झालेले आहे. त्याचा परिणाम जिल्ह्यातील जलस्त्रोतांवर झालेला आहे. दोन वर्षांपासून पांझरा नदीला पाहिजे त्या प्रमाणात पूर आलेला नाही. तसेच तलाव, धरणांमध्येही पुरेसा पाणी साठा झालेला नाही.
जिल्हयाचे सरासरी पर्जन्यमान ५३२ मिलीमीटर असतांना गतवर्षी केवळ ४०७ मिलीमीटर पाऊस झाला होता. त्यातही सतत अवर्षणग्रस्त असलेल्या शिंदखेडा तालुक्यात सरासरीच्या तुलनेत फक्त ६३ टक्के पावसाची नोंद झालेली आहे.
पुरेशा प्रमाणात पाऊस न झाल्याने, जिल्ह्यातील विहिरींनी, तलावांनी तळ गाठलेला आहे. गेल्यावर्षी आॅक्टोबर-नोव्हेंबरपासूनच काही गावांना टॅँकरने पाणी पुरवठा सुरू करावा लागला होता.
गेल्यावर्षापर्यंत धुळ्यासह शिंदखेडा तालुक्यातच टॅँकरने पाणी पुरवठा करावा लागत होता. मात्र यावर्षी साक्री तालुक्यातही काही गावांना पाण्याचे टॅँकर सुरू झाल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आलेले आहे.
मे महिन्यात २० गावांमध्ये नव्याने टॅँकर सुरू झालेले आहेत. आजच्या स्थितीत जिल्ह्यातील ५९ गावांना ४३ टॅँकरद्वारे पाणी पुरवठा केला जातो आहे.त्यात सर्वाधिक टॅँकर शिंदखेडा तालुक्यात सुरू करण्यात आलेले आहेत. या तालुक्यातील २३ गावांसाठी १९, धुळे तालुक्यातील २० गावांसाठी १६, साक्री तालुक्यातील ७ वाड्या आणि ९ गावांसाठी आठ पाण्याचे टॅँकर सुरू करण्यात आलेले आहेत.
केवळ टॅँकरनेच पाणी पुरवठा होत आहे, असे नाही तर १६४ गावांमध्ये विहिरीही अधिग्रहित करण्यात आलेल्या आहेत.
तापमानात अशीच वाढ सुरू राहिल्यास तसेच जून महिन्याच्या मध्यापर्यंत दमदार पाऊस न झाल्यास काही गावांना अजून पाण्याची समस्या निर्माण होऊ शकते.