गृह विलगीकरणातील रुग्णसंख्या शून्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2021 04:24 IST2021-06-28T04:24:25+5:302021-06-28T04:24:25+5:30
धुळे : जिल्ह्यातील कोरोनाची दुसरी लाट उतरंडीला लागली आहे. सक्रिय रुग्णांची संख्या कमी झाली आहे. मृत्युसत्रही थांबले असल्याने ...

गृह विलगीकरणातील रुग्णसंख्या शून्यावर
धुळे : जिल्ह्यातील कोरोनाची दुसरी लाट उतरंडीला लागली आहे. सक्रिय रुग्णांची संख्या कमी झाली आहे. मृत्युसत्रही थांबले असल्याने दिलासा मिळाला आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सर्वाधिक फटका ग्रामीण भागाला बसला आहे. ग्रामीण भागात बाधित रुग्णांसोबतच मृत्यूचे प्रमाणही अधिक होते. मात्र, धुळे शहरासोबतच चारही तालुक्यांतील सक्रिय रुग्णांची संख्या कमी झाली आहे. दरम्यान, कोरोनाचा नवा विषाणू डेल्टा प्लसचे २१ रुग्ण राज्यात आढळले आहेत. मात्र, धुळे जिल्ह्यात डेल्टा प्लसचा एकही रुग्ण नसल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे, तर तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर निर्बंध कडक करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.
धुळे शहरातील रुग्ण ५० च्या आत
- धुळे शहरातील सक्रिय रुग्णांची संख्या ५० च्या खाली आली आहे. शहरातील ३८ रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. मागील काही दिवसांपासून शहरातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने दिलासा मिळाला आहे. तसेच मृत्युसत्रही थांबले आहे.
१२ रुग्णांना तीव्र लक्षणे
- जिल्ह्यातील ५६ कोरोनाबाधित रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. त्यापैकी १२ रुग्णांना तीव्र स्वरूपाची लक्षणे जाणवत आहेत. लक्षणे नसलेल्या रुग्णांची संख्या शून्यावर आली असून, १३ रुग्णांना सौम्य स्वरूपाची लक्षणे जाणवत आहेत. तसेच ३१ रुग्णांना माध्यम स्वरूपाची लक्षणे आहेत.
साक्री तालुक्यात ८ रुग्ण
धुळे - कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी झाली असली तरी इतर तालुक्यांच्या तुलनेत साक्री तालुक्यात रुग्णांची संख्या जास्त आहे. साक्री तालुक्यातील ८ रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. शिरपूर तालुक्यातील ६, शिंदखेडा ३ व धुळे तालुक्यातील एका रुग्णावर उपचार सुरू आहेत.
३२५ अहवाल प्रलंबित
- शनिवार अखेरपर्यंत जिल्ह्यातील ३२५ कोरोना चाचणी अहवाल प्रलंबित आहेत. त्यात शिरपूर येथील १९, दोंडाईचा येथील ७, तर धुळे शहरात मनपाच्या आरोग्य पथकाने घेतलेल्या २९९ चाचण्यांचा समावेश आहे.
गृह विलगीकरणात एकही रुग्ण नाही
- जिल्ह्यातील सक्रिय रुग्णांची संख्या कमी झाल्याने गृह विलगीकरणात असलेल्या रुग्णांची संख्या शून्यावर आली आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत गृह विलगीकरणात उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या दोन हजारांपर्यंत पोहोचली होती.