आता खऱ्या अर्थाने शैक्षणिक वर्षाची झाली सुुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 04:32 IST2021-02-15T04:32:04+5:302021-02-15T04:32:04+5:30
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गेल्यावर्षी परीक्षा कुठे झाल्या, अन् निकाल कुठे लागले याचा फारसा गवगवा झालाच नाही. जून महिन्यापासून नियमित शैक्षणिक ...

आता खऱ्या अर्थाने शैक्षणिक वर्षाची झाली सुुरुवात
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गेल्यावर्षी परीक्षा कुठे झाल्या, अन् निकाल कुठे लागले याचा फारसा गवगवा झालाच नाही. जून महिन्यापासून नियमित शैक्षणिक वर्ष सुरू झाले नाही. मात्र विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्षाचे नुकसान नको म्हणून ॲानलाइन शिक्षण सुरू झाले. मात्र ते किती मुलांना मिळाले, किती जणांना समजले हा प्रश्न अनुत्तरीतच आहे. शासकीय आकडे मोठे दिसत असली तरी त्यातही तफावत होती.
दरम्यान वरिष्ठ महाविद्यालये अगोदर सुरू करून नंतर प्राथमिक, माध्यमिक शाळा सुरू करणे गरजेचे होते. मात्र शिक्षण विभागाने येथेही आपली ‘कार्यपद्धती’कशी आहे, हे दाखवून दिले. अगोदर नववी ते १२वीपर्यंतच्या शाळा सुरू केल्या. यात कोणीही बाधित न आढळल्याने, दीड महिन्यानंतर पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू केले. या ठिकाणीही एकही विद्यार्थ्याला संसर्ग झाला नसल्याने, आता वरिष्ठ महाविद्यालये सुरू करण्यास हरकत नाही, असे समजून शिक्षण विभागाने १५ फेब्रुवारीपासून वरिष्ठ महाविद्यालये सुरू करण्यास हिरवी झेंडी दाखवली आहे.
वास्तविक गेल्या दीड महिन्यापूर्वीच वरिष्ठ महाविद्यालये सुरू झाली असती, तर आतापर्यंत त्यांचा बराच अभ्यासक्रम झाला असता, प्रॅक्टिकल्सही झाले असते. मात्र तसे न करता उच्च व तंत्र शिक्षण विभागाने सर्वात शेवटी महाविद्यालये सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या या निर्णयाचे गुपित अजूनही उलगडले नाही. असो आता वरिष्ठ महाविद्यालये सुरू होत आहे, ही समाधानाची बाब आहे.
दरम्यान आता महाविद्यालये सुरू होणार असल्याने, विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम कसा पूर्ण होईल याकडे लक्ष देण्याची गरज आहे. कारण वरिष्ठ महाविद्यालयाच्या परीक्षाही भरउन्हाळ्यात म्हणजे एप्रिल-मे महिन्यात होण्याची शक्यता असून, त्यासाठी आता तीन ते साडेतीन महिन्याचाच कालावधी हाती आहे. त्यामुळे जास्तीत जास्त तासिका घेऊन शिक्षकांनाही अभ्यासक्रम, प्रॅक्टिकल्स करून घेणे गरजेचे ठरणार आहे. विद्यार्थी सज्ञान असल्याने, दुर्लक्ष करून चालणार नाही. कोरोनाचे नियमांचेही पालन होणे गरजेचे आहे.