शासनाने १८ वर्षांवरील नागरिकांना १ मेपासून लस देण्याची घोषणा केली होती, परंतु लसीचा तुटवडा असल्याने प्रत्यक्षात लसीकरण सुरू होणार की नाही, याविषयी साशंकता व्यक्त केली जात होती. लसीकरण पुढे ढकलण्यात येणार असल्याचेही बोलले जात होते, परंतु शेवटच्या क्षणी धुळे जिल्ह्यात ५ केंद्रांवर पहिल्याच दिवशी १८ वर्षांवरील नागरिकांना लस टोचण्याचे नियोजन करण्यात आले. मात्र, पहिल्याच दिवशी शिरपूर व साक्री येथील केंद्रावर लसीचा पुरवठा न झाल्यामुळे केंद्र सुरू करण्यात आले नाहीत. मात्र, नागरिकांनी मोठी गर्दी केली, अनेकांनी येथील उपजिल्हा रुग्णालयात गर्दी करून गोंधळ घातला.
उपजिल्हा रुग्णालयातचे वैद्यकीय अधीक्षक डॉ़.धु्रवराज वाघ यांच्याकडे अनेकांनी धाव घेतली. त्यावेळी त्यांनी या रुग्णालयात १८ वर्षांवरील लोकांऐवजी ४५ वर्षांवरील लोकांना लस दिली जाईल़, १८ वर्षांवरील लोकांसाठी शहरातील वाल्मिकनगरातील उपकेंद्रात सुविधा करण्यात आल्याचे उपस्थितांना सांगण्यात आल्यामुळे त्या नागरिकांनी लगेच त्या उपकेंद्रात धाव घेतली. मात्र, ते उपकेंद्राला कुणीच उपस्थित नव्हते. त्यामुळे पुन्हा ते नागरिक उपजिल्हा रुग्णालयात आले. बराच गोंधळ झाल्यानंतर नागरिक आपआपल्या घरी लस न घेता निघून गेले.
२ तारखेपासून वाल्मिकनगरऐवजी नपाच्या इंदिरा गांधी मेमोरियल हॉस्पिटलला १८ वर्षांवरील नागरिकांना लस देण्याचे ठरविण्यात आले. मात्र, २ रोजी सकाळी ११ वाजेनंतर १,५०० लस प्राप्त झाल्यानंतर अवघ्या काही वेळानंतर येथील हॉस्पिटलमध्ये नोंदणी केलेल्या नागरिकांना लस देण्यात आली. मात्र, ज्यांनी २ तारखेची नोंदणी केली होती, असे बोटावरच मोजण्याइतके नागरिक आलेत. मात्र, ज्यांनी नोंदणी केली नव्हती, अशा नागरिकांनी हॉस्पिटलला गर्दी केली, परंतु त्यांना नोंदणीअभावी लस न देण्यात आल्यामुळे त्यांच्यात गोंधळ उडाला.
१८ ते ४४ वयोगटांतील नागरिकांनी लस घेण्यासाठी शासकीय निर्देशानुसार कोविन पोर्टलवर रीतसर नोंदणी करणे अनिवार्य आहे. केवळ ऑनलाइन नोंदणी केलेल्या नागरिकांचेच लसीकरण केले जाणार आहे. ही नोंदणी झाल्यानंतर पोर्टलवर दिनांक निवडून आपली अपॉइंटमेंट आरक्षित करावयाची आहे आणि त्या वेळेला त्या केंद्रावर जाऊन लस घ्यावयाची आहे, असे नगरपालिकेने स्पष्ट केले आहे.
दरम्यान, तालुक्यातील ८ प्राथमिक आरोग्य केंद्रावर होत असलेले लसीकरणही लसींचा तुटवडा होत असल्याने बंद आहे. रविवार उशिरापर्यंत लस उपलब्ध झालेली नव्हती. कदाचित, सोमवारी सकाळी लस प्राप्त झाल्यास तरच दुपारीन लस दिली जाणार आहे, अन्यथा सोमवारीही लसीकरण ठप्प पडणार आहे.
येथील उपजिल्हा रुग्णालयात १ मेपर्यंत ९ हजार १६० कोविशिल्ड लसीचा पुरवठा झाला होता, त्यापैकी ८ हजार ६९३ जणांना लस देण्यात आली आहे. लसीचा साठा उपलब्ध नसल्यामुळे रविवारी लसीकरण करता आले नाही. पहिला डोस आरोग्यसेवक २६३४, फ्रंटलाइन वर्कर ५५६, ज्येष्ठ नागरिक २,१५५, ४५ वर्षांवरील १,७५८ असे एकूण ७ हजार १०३ जणांना पहिला डोस देण्यात आला आहे. दुसरा डोस आरोग्यसेवक ५१४, फ्रंटलाइन वर्कर ३६०, ज्येष्ठ नागरिक ३९४, ४५ वर्षांवरील ३२२ असे एकूण १ हजार ५९० म्हणजेच आतापर्यंत या रुग्णालयात एकूण ८ हजार ६९३ जणांना लस देण्यात आली आहे.
१८ ते ४४ वयोगटांतील नागरिकांसाठी:
१८ ते ४४ वयोगटांतील नागरिकांनी कोविन पोर्टलवर तारखेनिहाय व वेळेनुसार नोंदणी केलेल्या नागरिकांनाच येथील इंदिरा गांधी मेमोरियल हॉस्पिटला लस दिली जात आहे. त्यासाठी नोंदणी सोबत तारीख व त्या दिवशी ९ ते ११, ११-१, १-३ व ३ ते ५ असे या वेळेपैकी एका ठिकाणाची नोंदणी केली असेल, त्यांनाच लस दिली जाणार आहे, जेणेकरून लसीच्या ठिकाणी गर्दी होणार नाही, याची दक्षता घेण्यात आली आहे. नपा सीईओ अमोल बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ़.नितू बत्रा हे काम पाहात आहेत. सध्या तरी या वयोगटासाठी एकमेव हे केंद्र असणार आहे.
येथील उपजिल्हा रुग्णालयात ४५ वयोगटांतील नागरिकांसाठी लस दिली जात आहे. वैद्यकीय अधिकारी डॉ़.धु्रवराज वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ़.नितीन निकम, एम़एस़धमके यांचे पथक पहिल्या गटातील लसीकरणासाठी सज्ज आहे. ४५ वर्षांवरील नागरिकांनी लवकरात लवकर लस टोचून घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.