दाेन वर्षात एकही पुरुषाकडून झाली नाही नसबंदी; उच्चशिक्षितांमध्येही गैरसमज कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 04:33 IST2021-02-07T04:33:26+5:302021-02-07T04:33:26+5:30
लोकसंख्या नियंत्रणासाठी शासनाकडून वेगवेगळ्या योजना तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर होत असला तरी पुरुषी मानसिकतेत जोपर्यंत बदल होणार नाही तोपर्यंत ...

दाेन वर्षात एकही पुरुषाकडून झाली नाही नसबंदी; उच्चशिक्षितांमध्येही गैरसमज कायम
लोकसंख्या नियंत्रणासाठी शासनाकडून वेगवेगळ्या योजना तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर होत असला तरी पुरुषी मानसिकतेत जोपर्यंत बदल होणार नाही तोपर्यंत शासनाच्या नसबंदी कार्यक्रमात पुरुषांचा सहभाग अत्यल्पच राहणार. हे पुरुष नसबंदी शस्त्रक्रियेच्या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.
११०० महिलांची शस्त्रक्रिया
शासनाकडून महापालिका आरोग्य केंद्राला कुटुंब कल्याण शस्त्रक्रियेसाठी २०१८-२०१९ या वर्षात १ हजार ७१८ उदिष्ट देण्यात आले होते़ त्यापैकी १ हजार १२६ उदिष्ट पूर्ण केले आहे़ त्यात दोन अपत्यानंतर शस्त्रक्रिया करण्यात प्रशासनाने ६० टक्के उदिष्ट पूर्ण केले आहे़
सकारात्मक परिणाम नाही
विवाहित जोडप्यापैकी पुरुष किंवा महिला या दोघांपैकी एकाची नसबंदी करण्यात येते़ महापालिकेच्या आरोग्य केंद्रातर्फे नसबंदीबाबत बरीच जनजागृती झाल्यानंतर नसबंदीचे प्रमाण वाढले़ मात्र महिलांचाच समावेश जास्त आहे़ महिलांच्या तुलनेत पुरुषांची शस्त्रक्रिया साधी व सोप्या पद्धतीने असते़
महिलांच्या तुलनेत पुरुषांच्या नसबंदीचे प्रमाण वाढावे, यासाठी आरोग्य विभागातर्फे जनजागृती केली जात आहे़ मात्र सकारात्मक परिणाम अद्याप दिसून आलेला नाही़
सहा पुरुषांनी घेतला पुढाकार
महापालिका आरोग्य केंद्रात २०१६-१७ व २०१७-१८ या वर्षात सहा पुरुषांनी स्वत:हून नसबंदी करून घेतली आहे़ तर २०१८-१९ या वर्षात १ हजार १२६ महिलांची कुटुंब शस्त्रक्रिया करण्यात आली़ तर एकाही पुरुषाची नसबंदी झाली नसल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले़
आरोग्य केंद्रातून मिळेल सुविधा
महापालिका आरोग्य केद्रामार्फेत प्रसूतीसाठी चांगला प्रतिसाद मिळत आहे़ काही वर्षात आरोग्य केंद्र, शासकीय व खासगी रुग्णालयामधून ९५ टक्क्यांपेक्षा जास्त महिला प्रसूती झाल्या आहेत. जननी शिशू सुरक्षा कार्यक्रमाअंतर्गत २४ तास सेवा रुग्णवाहिकेची सुविधा आहे़ त्यामुळे गरोदर मातांची नोंदणी, तपासणी, औषधोपचार, बाळंतपण, प्रयोगशाळा तपासण्या, सिझेरियन सेक्शन, रक्त संक्रमण या मोफत सुविधांचा समावेश आहे.
बँक खात्यात मिळतो लाभ
कुटुंब नियोजनासाठी शासनाकडून पुरुषांना ११०० रु.चे अर्थसहाय्य दिले जाते़ तर बीपीएल रेशनकार्डधारक महिला लाभार्थ्यांना ६०० तर इतर महिला लाभार्थ्यांना २५० रुपयांपर्यत अर्थसहाय्य शासनाकडून त्यांच्या बँकेच्या खात्याद्वारे देण्यात येते़
राज्यात पुरुष नसबंदी केवळ १६ टक्के
पुरुष नसबंदी ही एक झटपट शस्त्रक्रिया आहे. स्त्री नसबंदी शस्त्रक्रियापेक्षा ती फारच सोपी आणि सुरक्षित आहे. ही शस्त्रक्रिया स्थानिक भूल देऊन प्राथमिक आरोग्य केंद्रातसुद्धा करता येते. या शस्त्रेक्रियेनंतर तासाभरात घरी जाता येते़ मात्र तरीदेखील समाजात नसबंदीसंदर्भात मोठ्या प्रमाणात समज-गैरसमज आहेत़
पुरुष नसबंदी शस्त्रक्रिया केवळ पाच ते दहा मिनिटांची असून अतिशय सोप्या पद्धतीची आहे़ शस्त्रक्रियेनंतर पुरुषांना ११०० रुपयांपर्यंत मानधन दिले जाते़ महिलांना शस्त्रक्रियेसाठी आठ दिवस दवाखान्यात दाखल व्हावे लागते़ एप्रिल २०१८-२०१९ या कालावधीत राज्यातील ३ लाख २८ हजार ६६ महिलांनी कुटुंब नियोजन केले आहे़ त्यात २.९६ टक्के पुरुषांनी शस्त्रक्रिया केली असून फक्त १६ टक्के पुरुषांचे उद्दिष्ट आहे़