नवलनगरचा लाचखोर तलाठी एसीबीच्या जाळ्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2018 22:37 IST2018-08-27T22:33:27+5:302018-08-27T22:37:44+5:30
कारवाई : ५०० रुपये घेणे पडले महागात

नवलनगरचा लाचखोर तलाठी एसीबीच्या जाळ्यात
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : वडिलोपार्जित शेत जमिनीवरील वारस हक्कांची नावे कमी करण्यासाठी ५०० रुपयांची लाच स्विकारताना नवलनगरचा तलाठी चंद्रकिरण रायभान साळवे (४२) याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले़
धुळे तालुक्यातील नवलनगर येथे तक्रारदाराची वडिलोपार्जित शेत जमिन आहे़ या शेत जमिनीवर वडीलांची बहिण, आत्या व त्यांची मुले यांची वारसहक्कात नाव आहेत़ तक्रारदार यांनी १० आॅगस्ट रोजी वडिलांच्या नावे असलेल्या वडीलोपार्जित शेत जमिनीवरील वारसहक्कांची नावे कमी करण्यासाठी धुळ्यातील रजिष्टर कार्यालयात अर्ज सादर केला होता़ त्यानुसार सदर अर्ज चौकशीकामी नवलनगर येथील तलाठी चंद्रकिरण साळवे यांच्याकडे आलेला असल्याने तक्रारदार यांनी यासंदर्भात नावे कमी करण्याबाबत विनंती केली होती़ त्यानंतर तलाठी साळवे यांनी तक्रारदाराकडे ५०० रुपयांच्या लाचेची मागणी केली होती़ तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे यासंदर्भात तक्रार केली होती़ त्यानुसार, धुळे तालुक्यातील नवलनगर येथेच तलाठी साळवे याला सापळा लावून रंगेहात पकडण्यात आले़
ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक डॉ़ पंजाबराव उगले, अपर पोलीस अधीक्षक निलेश सोनवणे, धुळ्याचे पोलीस उपअधीक्षक शत्रुघ्न माळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महेश भोरटेकर, पोलीस निरीक्षक पवन देसले व त्यांच्या पथकातील नरेंद्र कुलकर्णी, जयंत साळवे, संदिप सरग, संतोष हिरे, प्रशांत चौधरी, सतिष जावरे, शरद काटके, कृष्णकांत वाडीले, कैलास जोहरे, भुषण खलाणेकर, सुधीर सोनवणे, प्रकाश सोनार, संदिप कदम व सुधीर मोरे यांनी केली आहे़