मुलांना मारुन स्वत: आत्महत्या करणाऱ्या मृत महिलेविरुध्द खुनाचा गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 21:56 IST2020-12-17T21:56:37+5:302020-12-17T21:56:37+5:30
साक्री येथील आदर्श नगरातील थरार : जुलैमधील घटनेचा तपास धुळे - साक्री येथील आदर्श नगरात तीन वर्षीय भाग्यश्री आणि ...

मुलांना मारुन स्वत: आत्महत्या करणाऱ्या मृत महिलेविरुध्द खुनाचा गुन्हा दाखल
साक्री येथील आदर्श नगरातील थरार : जुलैमधील घटनेचा तपास
धुळे - साक्री येथील आदर्श नगरात तीन वर्षीय भाग्यश्री आणि पाच वर्षीय रिया या दोन मुलींना मारुन टाकल्यानंतर घरातच स्वत:ने गळफास घेऊन अनिता शिंदे या महिलेने आपले जीवन संपविले़ हे प्रकरण २३ जुलै २०२० रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास घडले होते़ याप्रकरणी साक्री पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता़ तपासाअंती ही महिलाच मुलाच्या मृत्यूला कारणीभूत असल्याने मयत अनिता पंकज शिंदे (२८, रा़ आदर्श नगर, साक्री) या मृत महिलेविरुध्द भादंवि कलम ३०२ प्रमाणे १६ डिसेंबर रोजी दुपारी ४ वाजता दाखल करण्यात आला़
साक्री शहरातील आदर्श नगरात राहणारे पंकज शिंदे हे आपल्या पत्नी व दोन मुलींसह राहतात. ते फर्निचर तयार करण्याचे काम करतात. काही दिवसापूर्वीचे त्यांचे सासरे मृत अनिताचे वडील काशिनाथ जाधव रा. पोहाणे ता.मालेगाव येथून साक्रीला राहण्यासाठी आले होते. दोघेही फर्निचरचे काम करण्यासाठी सोबत जायचे. सध्या शहरातील बस स्थानकासमोरील एका दुकानात फर्निचरचे काम सुरु होते. नेहमीप्रमाणे सकाळी दोघे फर्निचरच्या कामासाठी घरातून निघाले. तेव्हा घरात अनिता आपल्या दोन्ही मुलींसह एकटी होती. २३ जुलै २०२० रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास दोघेही जेवणासाठी आदर्श नगरात आपल्या घरी आले. तेव्हा घराचा दरवाजा उघडा होता. घरात गेल्यावर दोघांना भीषण दृष्य दिसले. घरात अनिताने आपल्या दोन्ही मुलींसह गळफास घेतला होता.
काशिनाथ जाधव चक्कर येऊन जमिनीवर कोसळले - मुलगी व दोन्ही नातींना गळफास घेतलेल्या अवस्थेत पाहून काशिनाथ जाधव हे चक्कर येऊन जमिनीवर कोसळले आणि बेशुद्ध झाले. तर पंकजने शेजारच्या लोकांना बोलावून आधी पोलिसांना माहिती दिली. पोलीस आल्यानंतर त्यांच्या मदतीने तिघांना खाली उतरविण्यात आल्यानंतर तिघांचे मृतदेह साक्री रुग्णालयात पाठविण्यात आले होते़
नातेवाईकांचा आक्रोश -
साक्री पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. तिघांचे मृतदेह साक्रीच्या ग्रामीण रुग्णालयात आणले गेले. यावेळी मृतांचे नातेवाईक यांनी एकच आक्रोश केला होता. एका आईने आपल्या पोटच्या गोळ्यांना अशाप्रकारे संपविल्याने त्यांच्यावर असे कोणते मोठे संकट आले होते, हे मात्र कळायला मार्ग नाही़ घरात पतीचा किंवा अन्य कोणाचाही त्रास नसल्याचेही समोर आले़ कारण मृत महिलेचे वडील व जावाई एकत्रितच काम करत होते. त्यामुळे या घटनेचे गूढ अधिकच वाढले होते़
आधी मुलींना गळफास दिल्याची शक्यता - मृत अनिता हिने आत्महत्या करण्यापूर्वी आपल्या दोन्ही लहान मुलींना गळफास देऊन मारले असावे असा प्रथमदर्शनी संशय व्यक्त होत होता़ पोलिसात गुन्हा दाखल झाल्यानंतर तपासाला सुरुवात झाली़ तपासाअंती दोन्ही मुलींना मारुन स्वत: आत्महत्या केल्याने या मृत अनिता विरुध्द भादंवि कलम ३०२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला़ पोलीस निरीक्षक दिनेश आहेर घटनेचा तपास करीत आहेत़