वीज कर्मचाऱ्यांना फ्रंटलाईन वर्कर घोषित करण्याच्या मागणीसाठी आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 04:34 IST2021-05-15T04:34:30+5:302021-05-15T04:34:30+5:30
वीज होती म्हणूनच दवाखाने, कोविड सेंटर्स, विलगीकरण कक्ष, ऑक्सिजन प्लांट, औषध निर्मिती कारखाने पूर्ण क्षमतेने कार्य करु शकले व ...

वीज कर्मचाऱ्यांना फ्रंटलाईन वर्कर घोषित करण्याच्या मागणीसाठी आंदोलन
वीज होती म्हणूनच दवाखाने, कोविड सेंटर्स, विलगीकरण कक्ष, ऑक्सिजन प्लांट, औषध निर्मिती कारखाने पूर्ण क्षमतेने कार्य करु शकले व करीत आहेत. वीज होती म्हणून वृत्तपत्रांचे सुद्धा प्रकाशन झाले, मात्र ही अविरत सेवा टिकवण्यास्तव ४00 वीज कामगार, अभियंते व अधिका-यांना कोविडची लागण होऊन प्राण गमवावे लागले. हे
जनतेला व शासनाला माहीत नाही. एप्रिल महिन्यांत ९0 वीज कर्मचाऱ्यांना कोविडची लागण झाल्याने स्मशानभूमीत दहन करावे लागले. शासन व जनतेकरिता आपले कर्तव्य अत्यंत जबाबदारीने बजावत असताना आतापर्यंत तिन्ही वीज कंपन्यांतील १५ हजार कर्मचारी कोविड संक्रमित झाले असून हॉस्पिटलमध्ये आहेत; मात्र
शासनाला जाग नाही.अशा महत्त्वपूर्ण, क्षणाक्षणाला जिवाचा धोका असणाऱ्या या वीज उद्योगातील कर्मचाऱ्यांना दवाखान्यांत बेड, व्हेंटिलेटर्स उपलब्ध होत नाहीत, विलगीकरण कक्ष मिळत नाहीत व प्राधान्याने लसीकरण तर दूर. केंद्र सरकारने त्यांच्या अखत्यारीतील वीज कामगारांना परिपत्रक काढून फ्रंटलाईन वर्कर्स घोषित केले, त्या
परिपत्रकांची प्रत महाराष्ट्र शासनालाही पाठवली मात्र महाराष्ट्र शासनाने कोरोना योद्धा म्हणून वीज कामगारांना ठरवले नाही; म्हणून तिन्ही कंपन्यांतील वीज कर्मचारी, अभियंते व अधिकाऱ्यांना फ्रंटलाईन वर्कर्स घोषित करा या
मागणीकरिता सोमवारी वीज कामगारांची राज्याच्या सर्व जिल्ह्यांच्या, डिव्हिजन,
सर्कल, झोन व पाॅवर स्टेशन येथे निदर्शने आंदोलन करणार आहेत. तशी लेखी सूचना मुख्यमंत्री व ऊर्जामंत्री यांना संघटनेचे अध्यक्ष मोहन शर्मा, सी.एन.देशमुख कृष्णाजी भोयर यांनी दिलेली आहे. हे आंदोलन यशस्वी करण्यासाठी एम.जी.धिवरे, जे.एन.बाविस्कर, पी.वाय.पाटील, नाना पाटील, वीरेंद्र पाटील,संध्या पाटील, विशाल पाटील, प्रकाश कोळी, व्ही.पी.सूर्यवंशी, दीपक सोनवणे, विनोद सोनवणे हे परिश्रम घेत आहेत.