खुनाच्या प्रयत्नासह महिलेचा विनयभंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2019 13:03 IST2019-01-07T13:01:48+5:302019-01-07T13:03:05+5:30
मुस्लिम नगर : आठ जणांविरुध्द गुन्हा नोंद

खुनाच्या प्रयत्नासह महिलेचा विनयभंग
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : पैशांच्या मागणीसाठी महिलेचा छळ करत तिच्या खुनाच्या प्रयत्नासह विनयभंग केल्याची फिर्याद चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली़ त्यानुसार आठ जणांविरुध्द गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे़ मुस्लिम नगरात घडलेल्या या घटनेमुळे परिसरात चर्चेला उधाण आले आहे़
शहरातील मुस्लिम नगरात राहणारी (सध्याचे वास्तव्य आयशा नगर, चाळीसगाव रोड, धुळे) विवाहितेने आपली कैफियत महिला तक्रार निवारण कक्षाकडे मांडली़ त्याठिकाणी प्राथमिक चौकशी झाल्यानंतर चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यात महिलेची फिर्याद नोंदविण्यात आली आहे़ माहेरुन पाच लाख रुपये आणावे या मागणीसाठी विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केला जात होता़ हाताबुक्यांनी मारहाण करत शिवीगाळ देखील केली जात होती़ तिच्या अंगावरील स्त्रीधन देखील काढून घेण्यात आले होते़ एवढ्यावरच न राहता तिच्या मानेच्या दिशेने जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने चाकू मारला होता़ त्यानंतर तिचा गळा दाबून तिला मारण्याचाही प्रयत्न करण्यात आला होता़ पण, सुदैवाने यात ती वाचली़ याशिवाय तिच्या मनाला लज्जा वाटेल असे कृत्य केल्याने यात तिचा विनयभंग देखील करण्यात आला़ ही घटना १८ नोव्हेंबर २०१८ रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास घडली़
या घटनेनंतर पीडितेने महिला तक्रार निवारण कक्षाकडे न्यायासाठी धाव घेतली़ यात तिने आपली कैफियात मांडल्यानंतर चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यात रविवारी दुपारी पावणे दोन वाजेच्या सुमारास फिर्याद नोंदविण्यात आली़ त्यानुसार, अलीम खाँ काझी, रईसा अलीम काझी, रहिम अली काझी, निलोफर रहिम काझी, सादीक खाँ अलीम खाँ काझी, सईद खाँ अलीम खाँ काझी, गुलशन मोहसीन शेख, रऊफ अलीम खाँ काझी (सर्व रा़ मुस्लिम नगर, धुळे) या संशयितांविरोधात भादंवि कलम ३०७, ४२०, ३५४, ४९८ (अ), ४०६, ४२७, ३२३, ५०४, ५०६, ३४ प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला आहे़ पोलीस उपनिरीक्षक पी़ ए़ शिरसाठ घटनेचा तपास करीत आहेत़