कारमधून वाहून नेला जाणारा गांजा मोहाडी पोलिसांनी पकडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 22:09 IST2021-01-04T22:08:55+5:302021-01-04T22:09:20+5:30
अवधान शिवारातील कारवाई, दोघांना केली अटक

कारमधून वाहून नेला जाणारा गांजा मोहाडी पोलिसांनी पकडला
धुळे : मुंबई-आग्रा महामार्गावरून एका कारमध्ये गांजा वाहून नेला जात असल्याची माहिती मोहाडी पोलिसांना मिळताच सापळा लावून कार थांबविण्यात आली. कारची तपासणी केली असता त्यात ४० हजार रुपये किमतीचा गांजा आढळून आला. अवधान शिवारात रविवारी दुपारी ही कारवाई केली असून दोघांना अटक केली आहे.
शिरपूरकडून मालेगावच्या दिशेने एक कार जात असून त्यात गांजा लपविण्यात आला आहे, अशी माहिती मोहाडी पोलीस ठाण्याचे साहायक पोलीस निरीक्षक योगेश राजगुरू यांना मिळाली. माहिती मिळताच मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर अवधान शिवारात मोहाडी पोलिसांनी रविवारी दुपारी सापळा लावला. त्याचवेळेस सदगुरू प्लायवूड अॅण्ड डोअर हाउससमोरून जाणारी एमएच ०५ बीजे ३१९० क्रमांकाची कार अडविण्यात आली. चालकाकडे विचारणा केल्यावर उडवाउडवीची उत्तरे मिळाल्याने कार बाजूला घेऊन त्याची तपासणी करण्यात आली. पिवळ्या रंगाच्या थैलीत चार प्लॅस्टिकच्या पिशवीत १० किलो १६१ ग्रॅम वजनाचा सुका हिरवट रंगाच्या भुग्यासह उग्र वासाचा गांजा आढळून आला. ४ हजार रुपये किलोप्रमाणे ४० हजार ६४४ रुपये किमतीचा गांजा जप्त करण्यात आला.
या प्रकरणी पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रभाकर ब्राह्मणे यांनी ३ जानेवारी रोजी रात्री सव्वानऊ वाजता फिर्याद दाखल केली. त्यानुसार, कारचालक इरफान युसुफ अन्सारी (३७) आणि मोहम्मद रेहान मो. हानिफ कुरेशी (१९) (दोन्ही रा. अंधेरी पश्चिम, मुंबई) या दोघांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस उपनिरीक्षक मुस्तफा मिर्झा करीत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक योगेश राजगुरु, मुस्तफा मिर्झा, राजेंद्र मराठे, प्रभाकर ब्राह्मणे, शाम निकम, गणेश भामरे, जितेंद्र वाघ, सचिन वाघ, अजय दाभाडे, धिरज गवते, कांतीलाल शिरसाठ यांनी कारवाई केली़