मोबाइल शॉप फोडले, सीसीटीव्हीत कैद झाला; चाळीसगाव रोड पोलिसांची कारवाई

By देवेंद्र पाठक | Updated: January 28, 2024 17:06 IST2024-01-28T17:06:29+5:302024-01-28T17:06:59+5:30

निळ्या रंगाचा शर्ट, आकाशी रंगाची जिन्स पॅन्ट घालून एकजण मोबाइल विक्रीच्या उद्देशाने फिरत असल्याचे पोलिसांना कळताच त्याला पकडण्यात आले

Mobile shop smashed, caught on CCTV; Action of Chalisgaon Road Police | मोबाइल शॉप फोडले, सीसीटीव्हीत कैद झाला; चाळीसगाव रोड पोलिसांची कारवाई

मोबाइल शॉप फोडले, सीसीटीव्हीत कैद झाला; चाळीसगाव रोड पोलिसांची कारवाई

धुळे : शहरातील शंभरफुटी रोडवरील माेबाइलचे दुकान फोडून ५४ हजार ७४० रुपयांचा ऐवज चोरून नेणाऱ्या चोरट्याला चाळीसगाव रोड पोलिसांनी शिताफीने जेरबंद केले. त्याच्याकडून चोरीला गेलेला मुद्देमाल हस्तगत केला. ही घटना बुधवारी पहाटे घडली होती. अरबाज उर्फ बबलू रफिक शेख (वय ३९, रा. बोरसे काॅलनी, चाैधरी पेट्रोल पंपाच्या मागे, धुळे) असे अटकेतील संशयिताचे नाव आहे.

शहरातील शंभर फुटी रोडवरील सहारा हाॅस्पिटलसमोर मोहम्मद शोएब शाैकत अली अन्सारी यांचे मोबाइलचे दुकान आहे. मंगळवारी नेहमीप्रमाणे दुकान बंद केल्यानंतर ते घरी गेले. बुधवारी पहाटे चोरट्याने दुकान फोडून मोबाइल, स्मार्ट वाॅच, रिचार्ज असा एकूण ५४ हजार ७४० रुपयांचा ऐवज चोरून नेला. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. याप्रकरणी चाळीसगाव रोड पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

तपास सुरू असतानाच संशयित चोरट्याबद्दल पोलिसांना माहिती मिळाली. निळ्या रंगाचा शर्ट, आकाशी रंगाची जिन्स पॅन्ट घालून एकजण मोबाइल विक्रीच्या उद्देशाने फिरत असल्याचे पोलिसांना कळताच त्याला पकडण्यात आले. त्याची चाैकशी केली असता त्याच्याकडून उडवाउडवीची उत्तरे मिळाली. परिणामी त्याला ताब्यात घेऊन पोलिसी खाक्या दाखविताच त्याने दुकान फोडल्याची कबुली दिली. शिवाय चाेरलेला ऐवज देखील काढून दिला.

ही कारवाई पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलिस अधीक्षक किशोर काळे, उपअधीक्षक एस. ऋषिकेश रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक जीवन बोरसे, कर्मचारी रवींद्र ठाकूर, पाथरवट, अविनाश वाघ, विनोद पाठक, योगेश पाटील, अतिक शेख, शोहेल बेग, देवेंद्र तायडे यांनी कारवाई केली.

Web Title: Mobile shop smashed, caught on CCTV; Action of Chalisgaon Road Police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.