मोबाईलसह २ लाखांचा ऐवज लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2019 22:54 IST2019-03-14T22:54:34+5:302019-03-14T22:54:56+5:30
दोंडाईचा येथील घटना : १५ हजाराची रोकड घेऊन चोरट्याचा पोबारा, दुकानदारांमध्ये भीती

मोबाईलसह २ लाखांचा ऐवज लंपास
लोकमत न्यूज नेटवर्क
दोंडाईचा : शहरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असतानाच चोरट्यांनी आता दुकान फोडीचे सत्र सुरु केल्याचे समोर आले़
बुधवारी रात्री चोरट्याने येथील बसस्थानकाच्या परिसरात असलेल्या एका मार्केटमधील गुरुकृपा नावाचे मोबाईल दुकान फोडून १५ हजार रोख रकमेसह मोबाईल सेट मिळून सुमारे २ लाख रुपयांचा ऐवज चोरुन नेला आहे़ दोंडाईचा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याचे काम सायंकाळी उशिरापर्यंत सुरु होते. बस स्थानक जवळील तखतमल मार्केटमध्ये ज्ञानेश्वर मुकुंदा गिरासे यांचे गुरुकृपा मोबाईल दुकान आहे. चोरट्याने दुकानाचे शटर उचकुन आत प्रवेश केला. १५ हजार रोख रक्कम, विविध कंपनीचे सुमारे १०० नवीन मोबाईल सेट, सहा दुरुस्तीला आलेले व दुकानातील कामाचे ५ मोबाईल चोरुन नेलेत. असे मिळून सुमारे २ लाख रुपयांची चोरी झाली. गुरुवारी सकाळी चोरी झाल्याचा प्रकार लक्षात आला. घटनेची माहिती दोंडाईचा पोलिसांना कळविण्यात आल्याने पोलिसांचे पथक घटनास्थळी तातडीने दाखल झाले होते़ त्यांनी पंचनामा केला असून चोरीचा गुन्हा नोंदविण्याचे काम सायंकाळी उशिरापर्यंत सुरु होते़