पावसाचे पाणी जिरविण्यात मनपा ‘फेल’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2019 11:35 IST2019-05-21T11:34:44+5:302019-05-21T11:35:17+5:30

महापालिका : रेन वॉटर हार्वेस्टिंग कायदा कागदावरच; पडताळणीसाठी यंत्रणा नाही

MNP fails to provide rain water | पावसाचे पाणी जिरविण्यात मनपा ‘फेल’

dhule

धुळे : कमी पर्जन्यमान आणि भूगर्भातील खालावलेली पाण्याची पातळीमुळे दरवर्षी पाणीटंचाईला सामोरे जावे लागते़ उपाय योजना म्हणून महापालिका हद्दीत रेन वॉटर हार्वेस्टिंग सक्तीची असतांना धुळ्यात मात्र या कायद्याची अंमलबजावणी होत नसल्याने हा कायदा कागदावरच दिसुन येत आहे़ 
महापालिका हद्दीत रेन वॉटर हार्वेस्टिंग सक्तीचे केले आहे़ त्यानुसार मनपा हद्दीतील ले आऊटमधील मोकळी जागा, हाऊसिंग सोसायटी, फ्लॅट, दुकानांचे गाळे,नवीन घरांचे बांधकाम यांच्यासाठी घराच्या छतावरील पावसाचे पाणी विशिष्ठ पध्दतीने जमिनीत सोडण्याचे व त्यावर लक्ष ठेवण्याचे निर्देश नगरविकास मंत्रालयाने दिले आहे.  
स्वयंप्रेरणेने अंमलबजावणी
 शहरातील काही सोसायटीमध्ये  स्वयंप्रेरणेने रहिवाशांनी याची अंमलबजावणी केल्याचे दिसून येते.  त्यात छतावर साचलेले पाणी इमारतीच्या खालील तळाजवळ एका टाकीत साठवले जाते आणि हे पाणी रोज वापरले जात असल्याचे दिसून येते.    
 घरपट्टीत दिली जाते सवलत
मालमत्ता धारकांनी त्यांच्या घराच्या छतावरील पाणी पाइपद्वारे विहिरीत किंवा जमिनीत जिरवण्यासाठी सोडल्याची  यंत्रणा केली तर त्या मालमत्ताधारकाला घरपट्टीत सवलत देण्यात येते. त्यासाठी त्यांनी वसुली विभागात अर्ज करावयाचा असतो. त्यानंतर संबंधित लिपिकाने पाहणी करून तसा अहवाल सादर केल्यावर ही सवलत देण्यात येते. मात्र मनपाकडून  नागरिकांना याबाबत माहिती दिली जात नसल्याने नागरिकांचे याकडे दुर्लक्ष आहे.  घराचे बांधकाम करण्यापूर्वी मनपाच्या नगररचना विभागाकडून बांधकाम आराखड्याची परवानगी घ्यावी लागते.  आराखड्यात रेन वॉटर हार्वेस्टिंगचा समावेश असेल तरच आराखड्याला परवानगी दिली जाते, अन्यथा नाही. पण प्रत्यक्षात मनपाकडून या नियमाचे काटेकोरपणे पालन केले जात नाही. नगररचना विभागाकडून  काहीच न बघता इमारतीच्या बांधकामांना मंजुरी दिली जाते. त्यामुळे शहरात अगदी बोटावर मोजण्या इतक्या ठिकाणीच हार्वेस्टींग केल्याचे दिसून येते.  कायद्याची अमंलबजावणीकडे दुर्लक्ष  होत असल्याने शहरात हार्वेस्टींग कोणी केले, यासंदर्भातील आकडेवारीही महापालिकेकडे उपलब्ध नाही.

प्रशासनाकडून जनजागृतीची गरज ़.. 
भूगर्भातील पाण्याची पातळी दिवसेंदिवस खालावत चालली आहे़ त्यामुळे पावसाचे वाहून जाणार पाणी अडविण्यासाठी रेन वॉटर हार्वेस्टिंगची कायद्याची सक्ती केली आहे़ मात्र महापालिकेच्या बहूसंख्य नगरसेवकांकडे रेन व्हॉटर हार्वेस्टिंग नाही़ त्यामुळे सर्वप्रथम नगरसेवकांना रेन व्हॉटर हार्वेस्टिंग बंधनकारक करण्याची गरज व्यक्त केली जात आहे़ 

रेन वॉटर हार्वेस्टिंगद्वारे घराच्या छतावर पावसाळ्यात पडणारे पाणी पाइपाद्वारे विहिरीत वा बोअरवेलमध्ये सोडले जाते. यातून जमिनीतील पाण्याची पातळी टिकून राहते. विहिरी उन्हाळ्यातही आटत नाहीत. तर कूपनलिकांना कायम पाणी असते. त्यातून नागरिकांची गरजही भागते. मात्र त्याकडेच नागरिक लक्ष देत नाही. त्यातून टंचाई जाणवते.
 महापालिका जिल्हा परिषद या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सर्वाधिक नागरिकांचा संपर्क येतो. दुसरी बाब म्हणजे या संस्था पाणी बचतीचा संदेश देत विविध कार्यक्रमही राबवतात. मात्र, त्याच संस्था पाणी जिरविण्याचा उपक्रम राबविताना दिसत नाही. शासकीय कार्यालयांच्या इमारतींमध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंची कोणतीही यंत्रणा नाही. त्यामुळे या शासकीय कार्यालयांमध्येच पाणी जिरवायला त्यातून बचत करायला फाटा दिला जात असल्याचे दिसून येते.

पुणे, मुंबई, नाशिक महापालिकेन बांधकाम परवानगी देतांना रेन वॉटर हार्वेस्टिंग कायदा सक्तीचा केला आहे़ धुळ्यात कायद्याबाबत सक्ती दिसुन येत नाही़ तसा नियम असले तर अमंलबजावणी केली जाईल़
- महेंद्र परदेशी , 
नगर रचनाकार,मनपा,धुळे  

Web Title: MNP fails to provide rain water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे