राज्याच्या अर्थसंकल्पाबाबत संमिश्र प्रतिक्रिया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:38 IST2021-03-09T04:38:51+5:302021-03-09T04:38:51+5:30
धुळे- राज्याचा जो अर्थसंकल्प आज सादर झाला. त्याला ना अर्थ आहे ना त्यात काही संकल्प आहे. अशी टीका माजी ...

राज्याच्या अर्थसंकल्पाबाबत संमिश्र प्रतिक्रिया
धुळे- राज्याचा जो अर्थसंकल्प आज सादर झाला. त्याला ना अर्थ आहे ना त्यात काही संकल्प आहे. अशी टीका माजी मंत्री तथा शिंदखेडा मतदारसंघाचे आ. जयकुमार रावल यांनी केली आहे. राज्यात आघाडी सरकार आले तर नेहमीच खान्देशावर अन्याय होत असतो ही परंपरा या महाविकास आघाडीनेही अखंडित ठेवली आहे. गेल्या वर्षभरात कोरोनामुळे राज्यावर मोठे संकट होते. या संकटामुळे सर्वच क्षेत्रांवर प्रतिकूल परिणाम झाला. अनेक घटकांना आर्थिक विवंचनेचा फटका आजही सहन करावा लागत आहे. यामधून बाहेर पडण्यासाठी मोठे पॅकेज सरकारने द्यायला हवे होते. पण कोणतेही पॅकेज घोषित न करून राज्याची निराशा केली आहे. राज्यातील कष्टकरी, शेतकरी, गोरगरीब जनतेच्या हितासाठी या अर्थसंकल्पात काहीही दिसून येत नाही. त्या सर्वांच्या तोंडाला पानेच पुसली असल्याची टीका आ. रावल यांनी केली आहे. विकास हाच उद्देश नवीन दिशा देणारा, ग्रामीण आणि शहरी भागाचे उत्थान करणारा, शेतकऱ्यांना भरीव मदत करणारा आणि विकासाला गती देणारा अर्थसंकल्प आहे. समाजातील सर्व घटकांचा विकास हा महाविकास आघाडीचा उद्देश या अर्थसंकल्पातून दिसून येतो. - श्याम सनेर, जिल्हाध्यक्ष काँग्रेस - जयकुमार रावल, आमदार, शिंदखेडा
सर्वसमावेशक अर्थसंकल्प
महाविकास आघाडी सरकारचा पहिला अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर राज्यात कोरोना महामारीचे संकट उभे राहिले. सरकारचे उत्पन्न कमी झाले तरीही आज सादर करण्यात आलेल्या या सरकारच्या दुसऱ्या अर्थसंकल्पात समाजातील सर्व घटकांना मग ते अनुसूचित जाती, जमाती, भटक्या विमुक्त जाती, इतर मागासवर्ग, अल्पसंख्याक, दिव्यांग, महिला, घरकाम करणाऱ्या महिला, शेतकरी यांना न्याय देण्याचा प्रयत्न सरकारने केलाच परंतु जल, जंगल, जमीन संवर्धन करण्यासाठी, पुरातन मंदिर जतन करण्यासाठी, पर्यटन स्थळे विकसित करण्यासाठी भरपूर निधीची तरतूद केली आहे. जागतिक महिला दिनानिमित्त सरकारने जिजाऊ गृहस्वामीनी योजना जाहीर केली असून १ एप्रिलपासून या योजनेअंतर्गत घर खरेदी महिलेच्या नावावर करणाऱ्यांना स्टॅम्प ड्युटीवर १ टक्का सवलत मिळणार आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळातील हा दुसरा अर्थसंकल्प समाजातील सर्व घटकांना न्याय देणारा, विकास घडवून आणणारा, पर्यटन धोरणाला चालना देणारा अर्थसंकल्प आहे. - कुणाल पाटील, आमदार, धुळे ग्रामीण
सर्वसामान्यांच्या हिताचा नाही
महाविकास आघाडी सरकारचे कंबरडे मोडल्याचे या अर्थसंकल्पाने दर्शवून दिले आहे. राज्यातील नागरिकांना काही देण्याची नीतिमत्ता नाही. कोविडच्या नावाने जनतेची दिशाभूल चालवली आहे. सर्वसामान्य, शेतकरी, व्यावसायिक, बेरोजगार तरुण अशा साऱ्याच घटकांना नाराज करणारा हा अर्थसंकल्प आहे. -नारायण पाटील, जिल्हाध्यक्ष, भारतीय जनता पार्टी
सर्वसामान्यांना दिलासा देणारा अर्थसंकल्प
वर्षभर काेरोनाचे संकट होते. सर्व व्यवहार ठप्प असल्याने उत्पन्नाचे स्त्रोत घटले होते. खर्च मात्र वाढला होता. बिकट परिस्थितीत केंद्र सरकारनेदेखील हात वर केले होते. जीएसटीचे पैसे दिले नाहीत. अशा संकट काळात राज्याचा गाडा सुरळीत चालावा, म्हणून कृषी क्षेत्र, आरोग्य, महिला, रस्ते, सामाजिक न्यायाच्या योजना अशा सर्व घटकांसह सर्वसामान्यांना दिलासा देणारा, शेतकऱ्यांना उभारी देणारा हा अर्थसंकल्प आहे. - हिलाल माळी, जिल्हाप्रमुख, शिवसेना
सर्वोत्कृष्ट अर्थसंकल्प
गेल्या पाच वर्षाच्या काळातील आतापर्यंतचा सर्वात चांगला अर्थसंकल्प अर्थमंत्री अजित पवार यांनी माडला आहे. केंद्र सरकारने राज्याचा निधी रोखून धरला असताना आणि कोरोनाच्या संकटात देखील ग्रामीण आणि शहरी भागाच्या सर्वांगीण विकासाचा मेळ घालणारा हा अर्थसंकल्प आहे. या अर्थसंकल्पातील तरतुदींचा धुळे शहरासह महानगरपालिका आणि वैद्यकीय महाविद्यालय, जिल्हा रुग्णालयाला फायदा होणार आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचा हा अर्थसंकल्प उत्कृष्ट आहे. - रणजीत भोसले, शहराध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस
उद्योजकांमध्ये नाराजीचा सूर
कोविड पश्चात अनेक आव्हानं असतांना देखील आरोग्य, कृषी, जलसंपदा, रस्ते विकास, शहरी व ग्रामीण पायाभूत सुविधा, रेल्वे, ग्रामविकास, मनुष्यबळ, महिला व बालविकास तसेच कामगार अशा अनेक घटकांचा विचार अर्थसंकल्पात केलेला आहे. परंतु उद्योगांसाठी ठळक आकर्षक घोषणा अर्थसंकल्पात दिसत नाहीत, रोजगारक्षम असूनही नेहमीप्रमाणे उद्योगांना गृहीत धरण्यात आले आहे. लॉकडाऊन नंतर नवीन आशा निर्माण होण्यासाठी उद्योगांना पुनरुज्जीवन देणारा विशेष बुस्टर डोस अपेक्षित होता. - राहुल कुलकर्णी, अध्यक्ष, लघु उद्योग भारती, धुळे