अमरावती मध्यम प्रकल्प स्थळी यांत्रिकी विभागाचे पथक दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2020 21:41 IST2020-12-18T21:41:31+5:302020-12-18T21:41:58+5:30
दरवर्षाप्रमाणे भेट : पाणी गळती मात्र सुरु

अमरावती मध्यम प्रकल्प स्थळी यांत्रिकी विभागाचे पथक दाखल
मालपूर : शिंदखेडा तालुक्यातील मालपूर येथील अमरावती मध्यम प्रकल्पाची यांत्रिकी विभागाच्या पथकाने भेट देवुन संपुर्ण धरणाची पाहणी केली. हा दरवर्षीचा सोपस्कार पूर्ण केला जातो़ मात्र वाया जाणारे पाणी अद्याप बंद झालेले दिसुन येत नाही.
दरवर्षी वर्षातून दोनवेळा हे पथक येत असते. मागील वर्षी देखील या विभागाने पाहणी करुन अहवाल धरण सुरक्षा विभागाकडे देवुन योग्य दुरुस्ती करु असे सांगितले. मात्र वर्षे उलटून गेले तरी या प्रकल्पाच्या डाव्या उजव्या कालव्याच्या मुख्य वितरकांना लागलेली पाण्याची गळती थांबलेली दिसुन येत नाही. दररोज या ठिकाणाहून लाखो लिटर पाणी वाया जाते. तसेच या पाण्याचा पाझर नजीकच्या शेतशिवारात होत असल्यामुळे येथील शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्यामुळे हे शेतकरी त्रस्त आहेत. या प्रकल्पाला दहा वक्राकार दरवाजे असुन यातुन देखील मोठ्या प्रमाणात पाण्याची गळती दिसुन येत आहे. मग दरवर्षी पाहणी करुन हे पथक नेमके साध्य करते तरी काय? का नुसता सोपस्कार पूर्ण केला जातो अशी येथील नागरिकांमध्ये चर्चा दिसुन आली. यासंदर्भात भ्रमणध्वनीवरुन पथकातील सदस्यांची संपर्क साधला असता माहिती देण्यास टाळाटाळ केली.