मालपूर येथे पशुधन विकास अधिकाऱ्यांअभावी पशुपालकांचे होतेय हाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 04:41 IST2021-09-15T04:41:35+5:302021-09-15T04:41:35+5:30
मालपूर येथे पशुवैद्यकीय श्रेणी एकचा दवाखाना असून, सध्या व्रणोचार व परिचर गुरांवर उपचार करताना दिसून येतात. यामुळे योग्य आजाराचे ...

मालपूर येथे पशुधन विकास अधिकाऱ्यांअभावी पशुपालकांचे होतेय हाल
मालपूर येथे पशुवैद्यकीय श्रेणी एकचा दवाखाना असून, सध्या व्रणोचार व परिचर गुरांवर उपचार करताना दिसून येतात. यामुळे योग्य आजाराचे निदान होत नसल्यामुळे येथील पशुपालक कैलास मोतीराम खलाणे यांची ८० हजार किमतीची दिवसाला २५ लीटर दूध देणारी गाय दोन वासरांना जन्म देऊन मेली. यामुळे मोठे आर्थिक नुकसान झाले. परिसरात लिंपी आजाराचे लक्षण असलेली गुरे दिसून येत असल्यामुळे येथील शेतकऱ्यांमधे भीतीचे वातावरण पसरत आहे. जिल्ह्यात मालपूर हे गाव दुग्ध व्यवसायात अग्रगण्य आहे. येथे दोन दूध शीतकेंद्र, दोन रजिस्टर सहकारी दूध उत्पादक संस्था आणि सुमारे १४ खासगी दूध डेअरी असून, येथील दुधाचा गुजरात राज्यातदेखील पुरवठा केला जातो. त्यामुळे साहजिकच येथे दुधाळ जनावरांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याचे विभागातर्फे स्पष्ट होते. मात्र, तरीदेखील साथै गोचीड निर्मूलन, पशुचे सर्व रोगनिदान शिबिरदेखील अद्याप झाले नाही. यामुळे या विभागाचा कारभार चव्हाट्यावर आला आहे. या दवाखान्याला मालपूरसह सुराय, अक्कलकोस, चुडाणे, कलवाड़े आदी गावे जोडण्यात आली आहेत. येथेही दुग्ध व्यवसाय मोठ्या प्रमाणावर आहे. जनावरांची संख्या लक्षणीय आहे. मात्र, मालपूर येथील पशुवैद्यकीय दवाखान्यातील सेवेचा बोजवारा उडालेला आहे. अनेकदा पशुपालकांना खासगी पशुवैद्यकीय डॉक्टरांकडून आजारी पशुंवर उपचार करून घ्यावे लागतात. यामुळे पशुपालकांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. त्यामुळे किमान प्रभारी डॉक्टरांनी तरी आठवड्यातून दोन दिवस येथे वैद्यकीय सेवा पुरवावी, अशी येथील पशुपालकांची मागणी आहे. पशुधन विकास विभागाने याची दखल घ्यावी. पशुधन व विकास अधिकाऱ्याची नियुक्ती करावी अन्यथा नजीकच्या काळात आंदोलनात्मक भूमिका घेतली जाईल, असा इशारा येथील पशुपालकांनी दिला असून, गावातील लोकप्रतिनिधींनी याची दखल घेऊन डॉक्टर उपलब्ध करण्यासाठी हालचाली कराव्यात.
तीन वर्षांपासून पद रिक्त....
मालपूर येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात किमान तीन वर्षांपासून पशुधन विकास अधिकारी श्रेणी एकची जागा रिक्त आहे. व्रणोपचारक पी. व्ही. चव्हाण व परिचर कार्यरत आहेत. ते वरिष्ठांना फोन करून त्यांच्या सल्ल्यानुसार काही जनावरांवर प्राथमिक उपचार करतात. काही वेळेस शेतात जावे लागत असल्यामुळे दवाखाना बंद करावा लागतो.
प्रतिक्रिया.....
वेळेवर डॉक्टर भेटला नाही म्हणून माझी ८० ते ८५ हजार रुपये किमतीची गाय मृत्यूमुखी पडली. खासगी डॉक्टरदेखील वेळेवर आले नाहीत. फोनवरून औषध द्यायचे. माझ्यावर जे संकट आले ते इतरांवर येऊ नये म्हणून येथे डॉक्टरांची सोय करावी.
कैलास मोतिराम खलाणे.
पशुपालक, मालपूर, ता. शिंदखेडा.