शोषणमुक्तीच्या चळवळीत दलित-आदिवासी साहित्याचे मोठे योगदान : काॅ. नजुबाई गावित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 04:38 IST2021-08-22T04:38:41+5:302021-08-22T04:38:41+5:30
धुळे : सत्यशोधक विद्यार्थी संघटनेचे कार्यकर्ते विद्रोही कवी जितेंद्र अहिरे यांच्या "आम्ही हिशोब घेवू" या काव्यसंग्रहाचे प्रकाशन जागतिक दर्जाच्या ...

शोषणमुक्तीच्या चळवळीत दलित-आदिवासी साहित्याचे मोठे योगदान : काॅ. नजुबाई गावित
धुळे : सत्यशोधक विद्यार्थी संघटनेचे कार्यकर्ते विद्रोही कवी जितेंद्र अहिरे यांच्या "आम्ही हिशोब घेवू" या काव्यसंग्रहाचे प्रकाशन जागतिक दर्जाच्या आदिवासी कादंबरीकार सत्यशोधक कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्या कॉ. नजुबाई गावित यांच्या हस्ते झाले.
धुळे येथे पत्रकार भवनात शनिवारी सकाळी झालेल्या या प्रकाशन साेहळ्याला सत्यशोधक जन आंदोलनाचे सचिव कॉ. सिद्धार्थ जगदेव, कॉ. दत्ता थोरात, विद्रोही कवी राजीव हाके , सचिन बागुल यांची प्रमुख उपस्थितीत होती.
कॉ. नजुबाई गावित यांनी विमोचनपर भाषणात महाराष्ट्रातील दलित साहित्य, आदिवासी साहित्य याबाबत भाष्य करीत व्यवस्थेला नकार देणाऱ्या दलित साहित्याने भारतीय दलित पँथर सारख्या चळवळीला जन्मास घातले असल्याचं नमूद केलं. दलित साहित्यिकांनंतर आदिवासी साहित्यिक प्रस्थापित व्यवस्थेला जाब विचारू लागले. निव्वळ जाब विचारून थांबले नाहीत तर शोषणमुक्तीच्या चळवळी उभ्या करण्यासाठी प्रयत्नरत राहिले. महाराष्ट्रात कॉ. शरद पाटील यांच्या नेतृत्वाखाली दलित आदिवासी ग्रामीण साहित्य महासभेचा यशस्वी प्रयोग करून अब्राह्मणी साहित्याच्या सौंदर्यशास्त्राचा मुद्दा साहित्यिक चळवळीच्या अजेंड्यावर आणला.
कॉ. नजुबाई भाषणात पुढे म्हणाल्या की, कवी जितेंद्र अहिरे यांची कविता प्रस्थापित व्यवस्थेला प्रश्न करते आणि कार्यकर्त्याला कृतीप्रवण बनण्यास भाग पाडते. आत्मचिकीत्सा करायला लावते.
विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे विद्रोही कवी राजीव हाके यांनी कविता संग्रहातील संस्कृती, एल्गार, चळवळीतील मुली या कवितेंचा संदर्भ घेवून समकालीन कवितेपेक्षा जितेंद्रची कविता सर्वार्थाने वेगळी असल्याचे विवेचन केले. विद्रोही कवी सचिन बागुल यांनी जितेंद्र ज्या परिस्थितीतून घडला त्याचे प्रतिबिंब त्याच्या कवितेत येतेण निव्वळ परिस्थिती पाहून रडत बसण्यापेक्षा परिस्थितीवर मात करीत चळवळ आणि विचार जागविण्याचा बोध जितेंद्रची कविता देते अशी समपर्क मांडणी केली. कॉ. सिद्धार्थ जगदेव यांनी काव्यसंग्रहाचे विश्लेषण करतांना सांगितले की, जितेंद्रने कवितेचा मुक्तछंद प्रकार निवडून व्यवस्थेवर कोरडे ओढले आहेत. त्यांच्या कवितेतील रूपक संभाजी भगत, शंतनू कांबळे यांच्या कवितेशी साधर्म्य दाखविणारे आहे. आई आणि पाऊस या कवितेतून जितेंद्रने अठराविश्व दारिद्र्य आणि पावसाचे नाजूक नाते अलगदपणे उलगडले आहे. गळणाऱ्या झोपडीत माझ्या पिलांना त्रास होऊ नये यासाठी तळमळणारी आई, या पावसात झोपडी सुरक्षित राहावी म्हणून आशाळभूत नजरेने ढगांकडे बघणा-या आईचे चित्रण चपखलपणे केल्याचे सिद्धार्थ जगदेव यांनी सांगितले.
त्यानंतर कवी जितेंद्र अहिरे यांना प्रा. मोहन मोरे, ज्वाला मोरे यांनी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमात जितेंद्रच्या कष्टकरी मातेचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. लोककवी दीपक निकम यांची "तांडा" कविता सादर करून सचिन बागुल यांनी कार्यक्रमाचा समारोप केला. कार्यक्रमासाठी प्रा. डॉ. महेंद्र वाढे, प्रा. प्रशांत कसवे, पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष मिलिंद बैसाणे, वंचित बहुजन आघाडीचे अॅड. चक्षुपाल बोरसे, भैय्या पारेराव, कवायित्री प्रणाली मराठे, माजी नगरसेविका अॅडण कामिनी पिंपळे, आझाद समाज पार्टीचे राहुल वाघ, लसीकरण अधिकारी रोहिणी जगदेव, पत्रकार रविंद्र नगराळे व शहरातील साहित्यिक, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस शाहीर मनोज नगराळे, सिद्धांत बागुल, तुषार सूर्यवंशी, प्रसेनजीत जगदेव, दीपक शिरसाठ, अमोल शिरसाठ, संदीप बोरसे, मनीष दामोदर, स्वाती त्रिभुवन यांनी क्रातीगीते सादर केली. कार्यक्रमाचे प्रस्ताविक महेंद्र शिंदे यांनी केले. सूत्रसंचालन राकेश अहिरे तर आभार शरद वेंदे यांनी मानले.