तर मजीप्रा वर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:25 IST2021-06-18T04:25:35+5:302021-06-18T04:25:35+5:30
धुळे : येथील झेड.बी. पाटील महाविद्यालय ते जयहिंद कनिष्ठ महाविद्यालय या रस्त्याची अवस्था अत्यंत वाईट झाली असून या ...

तर मजीप्रा वर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करणार
धुळे : येथील झेड.बी. पाटील महाविद्यालय ते जयहिंद कनिष्ठ महाविद्यालय या रस्त्याची अवस्था अत्यंत वाईट झाली असून या रस्त्यावर अपघात झाला तर महाराष्ट्र जीवन प्राधिकरणावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करु असा इशारा धुळ्याचे आमदार डॉ.फारुक शाह यांनी दिला आहे. गुरुवारी गुलमोहर विश्रामगृह येथे आ.शाह यांनी महापालिका, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांबरोबर विविध विषयांवर चर्चा केली. त्यानंतर त्यांनी देवपुरातील जयहिंद महाविद्यालय जवळील रस्त्याची पाहणी केली. जयहिंद महाविद्यालय परिसरातील रस्ता अत्यंत खराब झाला असून येत्या आठवड्याभरात रस्त्याचे काम सुरु झाले पाहिजे अशी ताकीदही त्यांनी ठेकेदाराला दिली. तसेच रस्त्याचे काम सुरु झाले नाही, कामात सुधारणा दिसून आली नाही तर ठेकेदाराला काळ्या यादीत टाकू असा इशाराही त्यांनी दिला आहे. खराब रस्त्यावर अपघात झाला तर मजीप्रावर गुन्हा दाखल करु असा इशाराही त्यांनी दिला आहे . गुलमोहर रेस्ट हाऊस येथे झालेल्या बैठकीत ताशा गल्ली भागातील अपार्टमेंट, वडजाई रोड येथील स्लॉटर हाऊसच्या मागे घरकुल बांधणे, अतिक्रमीत घरांना सातबारा उतारा देणे, अवधान तलावाच्या मालकी हक्काचे पत्र देवून अंदाजपत्रक तयार करणे , कमलाबाई शाळा , क्युमाईन क्लब पर्यंत लोखंडी पादचारी पुलाचे अंदाजपत्रक तयार करणे, सात कमान सुशोभिकरण, जामचा मळा येथे सबस्टेशन उभारणे, क्युमाईन क्लब ते कमलाबाई शाळा येथील साक्रीरोडवरील लाईन अंडरग्राऊंड करणे या विषयांवर चर्चा झाली. यावेळी महानगरपालिकेचे अभियंता कैलास शिंदे, मजीप्राचे अभियंता डी.ए.कुलकर्णी, डी.डी. पाटील आदी उपस्थित होते .