रेशन दुकानातून मका आणि ज्वारी देण्याच्या हालचाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 04:33 IST2021-02-14T04:33:52+5:302021-02-14T04:33:52+5:30
दुसरीकडे शेतकरी लाभार्थींना मात्र रेशनच्या मका, ज्वारीतून वगळण्यात आले आहे. दारिद्र्यरेषेखालील लाभार्थी, आर्थिकदृष्ट्या दुर्बल तसेच निराधार, गोरगरीब लाभार्थींना सार्वजनिक ...

रेशन दुकानातून मका आणि ज्वारी देण्याच्या हालचाली
दुसरीकडे शेतकरी लाभार्थींना मात्र रेशनच्या मका, ज्वारीतून वगळण्यात आले आहे. दारिद्र्यरेषेखालील लाभार्थी, आर्थिकदृष्ट्या दुर्बल तसेच निराधार, गोरगरीब लाभार्थींना सार्वजनिक वितरण प्रणालीअंतर्गत रेशनच्या अन्नधान्याचा लाभ दिला जातो. जिल्ह्यात ४ लाख ६९ हजार ५७६ शिधापत्रिका असून, अंत्योदय, प्राधान्य कुटुंब व एपीएल शेतकरी लाभार्थींना गहू व तांदळाचा लाभ दिला जातो. जानेवारी महिन्यापर्यंत प्राधान्य कुटुंब लाभार्थी योजनेंतर्गत प्रतिलाभार्थी ३ किलो गहू २ रुपये प्रतिकिलो दराने व २ किलो तांदूळ ३ रुपये प्रतिकिलो दराने दिला जात होता, तसेच अंत्योदय कार्डधारकांना प्रतिकार्ड १५ किलो गहू २ रुपये प्रतिकिलो दराने व २० किलो तांदूळ ३ रुपये प्रतिकिलो दराने वितरित करण्यात आला. फेब्रुवारी महिन्याचे वाटप झाले असल्याने हा बदल मार्च महिन्यापासून केला जाणार आहे. प्राधान्य कुटुंब तसेच अंत्योदय योजनेंतर्गतच्या लाभार्थींचे गव्हाचे प्रमाण ५० टक्के कमी करून, त्या ठिकाणी ४० टक्के मका व १० टक्के ज्वारीचे वितरण केले जाणार आहे. मका व ज्वारीचा विक्री दर प्रतिकिलो १ रुपया आहे. याचा लाभ जिल्ह्यातील प्राधान्य कुटुंब शिधापत्रिकाधारक व अंत्योदय शिधापत्रिकाधारकांना मिळणार आहे. या योजनेतून एपीएल शेतकरी शिधापत्रिकाधारकांना वगळण्यात आल्याने त्यांना रेशनवरील मका व ज्वारी मिळणार नाही.
एक किलोला एक रुपया
मका आणि ज्वारीसाठी लाभार्थींना एक किलोला एक रुपया द्यावा लागणार आहे. यापूर्वी दोन रुपये किलोने गहू व तीन रुपये किलोने तांदूळ दिला जात होता. आता एक रुपये किलोने मका आणि ज्वारीही दिली जाणार आहे. त्यामुळे लाभार्थींना दिलासा मिळाला आहे.