महाराष्ट्र युवक काँग्रेसच्यावतीने २५ हजार रक्तपिशव्या रक्तदान करण्याचा संकल्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2021 04:38 IST2021-04-28T04:38:42+5:302021-04-28T04:38:42+5:30
धुळे : गेल्या वर्षभरातील कोरोना काळात युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेले कार्य खरोखरच कौतुकास्पद असून, कोरोनाग्रस्तांसह तरुणांनी तळागाळातील व्यक्तिंना मदतीचा ...

महाराष्ट्र युवक काँग्रेसच्यावतीने २५ हजार रक्तपिशव्या रक्तदान करण्याचा संकल्प
धुळे : गेल्या वर्षभरातील कोरोना काळात युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेले कार्य खरोखरच कौतुकास्पद असून, कोरोनाग्रस्तांसह तरुणांनी तळागाळातील व्यक्तिंना मदतीचा हात दिला आहे. वर्षभरात महाराष्ट्रातील युवक काँग्रेसच्यावतीने २५ हजार पिशव्यांचे रक्तदान करण्याचा संकल्प केला असून, त्यामुळे कोरोनाग्रस्तांना फार मोठा आधार मिळणार आहे. युवक काँग्रेसच्या माध्यमातून निश्चितच भविष्याचे नेतृत्व तयार होईल आणि पक्षाला बळकटी मिळेल, असा विश्वास महाराष्ट्र युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष आमदार कुणाल पाटील यांनी व्यक्त केला.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष आमदार कुणाल पाटील यांच्यावर महाराष्ट्रातील युवक काँग्रेसची संघटनात्मक जबाबदारी दिल्यानंतर आमदार पाटील यांनी प्रदेशाध्यक्ष आमदार नानाभाऊ पटोले यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच प्रदेश कार्यकारिणी तसेच राज्यातील युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांच्या बैठकीचे दुरस्त प्रणाली (ऑनलाईन)व्दारे धुळ्यातून आयोजन केले होते. यावेळी गेल्या वर्षभरात कोरोना काळात युवक काँग्रेसने केलेली कामे तसेच महाराष्ट्र युवक काँग्रेसने केलेल्या कार्यक्रमांचा आढावा घेण्यात आला. प्रारंभी प्रास्ताविकात महाराष्ट्र युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांनी युवक काँग्रेसने केलेल्या कामांचे व्हिडिओ सादरीकरण केले. तसेच सुपर ६०, वेकअप महाराष्ट्र, जिल्हा हेल्पलाईन आदी उपक्रमांची माहिती दिली. महाराष्ट्रातील युवक काँग्रेसच्या पदाधिकार्यांना मार्गदर्शन करतांना कार्याध्यक्ष आमदार कुणाल पाटील यांनी सांगितले की, वर्षभरात युवक काँग्रेसच्यावतीने कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी २५ हजार रक्तपिशव्यांचे रक्तदान करण्याचा संकल्प करण्यात आला, ही खरोखरच कौतुकास्पद बाब आहे. युवकांच्या या कार्यामुळे पक्षाला बळकटी मिळणार आहे. कोरोना काळात युवक काँग्रेसने अन्नदान, सॅनिटायझर, मास्क वाटप, निर्जंतुकीकरणासाठी फवारणी, आर्सेनिक अल्बम गोळ्यांचे वाटप असे उपक्रम राबवून कोरोना रोखण्यात महत्त्वाचा वाटा उचलला आहे. यापुढील काळात बेहिशोबी बिलांवर वचक ठेवण्यासाठी युवक काँग्रेसच्यावतीने तरुणांच्या तज्ज्ञ पथकाची निर्मिती करुन गोरगरिबांना दिलासा देण्यात येईल, असे आमदार कुणाल पाटील यांनी सांगितले. बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आमदार नानाभाऊ पटोले यांनी सांगितले की, युवक काँग्रेस जातीभेद न करता सर्वसामान्यांच्या मदतीसाठी रस्त्यावर उतरुन काम करते. आज जी कामे तंत्रज्ञानामुळे होत आहेत, ती केवळ स्वर्गीय राजीव गांधी यांच्यामुळेच होत आहेत. केंद्र सरकारच्या माध्यमातून लसीकरण वेगवान झाले पाहिजे, तसेच अनेक ठिकाणी रेमडेसिविर इंजेक्शनचा काळा बाजार सुरु आहे. त्यामुळे सामान्य माणसांसाठी युवक काँग्रेसने रस्त्यावर उतरून न्याय मिळवून देण्याचे काम करावे, असे आवाहन त्यांनी शेवटी केले. आढावा बैठकीत युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष शिवराज मोरे, ब्रजकिशोर दत्त, नागसेन भेरजे, चिटणीस विवेक गावंडे, स्नेहा पाटील, स्वप्नील पाटील, प्रवक्ता कपिल ढोके आदींनी कोरोना महामारी रोखण्याबाबत आपल्या कल्पना मांडल्या. दुरस्त प्रणाली बैठकीचे सूत्रसंचालन बालाजी गाढे व कल्याणी माणगावे यांनी केले. विराज शिंदे यांनी आभार मानले.