Lumped goldsmith handed over to woman | लंपास झालेली सोनपोत महिलेकडे सुपूर्द

लंपास झालेली सोनपोत महिलेकडे सुपूर्द

धुळे : देवपुरातील जयहिंद कार्यालयाच्या मागे गरुड कॉलनी परिसरातून एका महिलेची सोनपोत चोरट्याने ओरबाडून नेली होती़ त्या चोरट्याला मध्यप्रदेशातील इंदूर येथे जावून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले़ दरम्यान, ही सोनपोत न्यायालयाच्या आदेशानंतर महिलेला सुपुर्द करण्यात आली़
जयहिंद कार्यालयाच्या मागे असलेल्या गरुड कॉलनीत राहणाऱ्या अलकाबाई भास्कर जाधव यांच्या गळ्यातील सोनपोत चोरट्याने हिसकावून घेत पोबारा केला होता़ या घटनेची नोंद पश्चिम देवपूर पोलीस ठाण्यात झाली होती़ पश्चिम देवपूर आणि स्थानिक गुन्हे शाखा यांचा समांतर तपास सुरु होता़ अशातच चोरट्याविषयी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना गोपनीय माहिती मिळाली़ माहिती मिळताच त्यांनी आपल्या पथकातील कर्मचाऱ्यांना मध्यप्रदेशातील गंगा कॉलनी, धार रोड, इंदूर येथे पाठविले़ पथकाने मोठ्या शिताफीने सापळा लावून संशयित अब्बास अली इबादत अली शेख (१९) याला पकडले आणि धुळ्यात आणले़ त्याला पोलीसी खाक्या दाखविताच त्याने सोन्याची मंगलपोत चोरल्याची कबुली दिल्याने त्याच्याकडून ती सोनपोत हस्तगत करण्यात आली़ जप्त करण्यात आलेला मुद्देमाल महिलेकडे सुपुर्द झाला़ यावेळी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, पश्चिम देवपूरचे पोलीस निरीक्षक कुबेर चवरे उपस्थित होते़
स्थानिक गुन्हे शाखेतील हनुमान उगले, रफिक पठाण, प्रभाकर बैसाणे, श्रीकांत पाटील, कुणाल पानपाटील, गौतम सपकाळे, उमेश पवार, रविकिरण राठोड, राहुल सानप, विशाल पाटील, तुषार पारधी यांनी ही सोनपोत चोरट्याला शोधण्याची कामगिरी केली आहे़

Web Title: Lumped goldsmith handed over to woman

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.