बाम्बशोधक श्वान पथकातील लुसीचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 04:27 IST2021-06-04T04:27:29+5:302021-06-04T04:27:29+5:30
धुळे : जिल्हा पोलीस दलाच्या बाॅम्बशोधक आणि बाॅम्बनाशक पथकात गेल्या ९ वर्षांपासून कार्यरत असलेल्या लुसी या श्वानाचा बुधवारी सायंकाळी ...

बाम्बशोधक श्वान पथकातील लुसीचा मृत्यू
धुळे : जिल्हा पोलीस दलाच्या बाॅम्बशोधक आणि बाॅम्बनाशक पथकात गेल्या ९ वर्षांपासून कार्यरत असलेल्या लुसी या श्वानाचा बुधवारी सायंकाळी मृत्यू झाला. वय पूर्ण झाल्याने तसेच आजारपणामुळे लुसीचा मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले. आर्वी, ता. धुळे येथे फायर बिट परिसरात शासकीय इतमामात दफनविधी करण्यात आला. बंदुकीच्या तीन फैरी झाडून मानवंदना देण्यात आली.
लुसीचे वय ९ वर्षे ६ महिने होते. काही दिवसांपासून ती आजारी होती. उपचार सुरू असताना तिचा मृत्यू झाला. जिल्हा पशुवैद्यकीय अधिकारी डाॅ. भूषण वाकडे यांनी तिला मृत घोषित केले.
२६ ऑक्टोबर २०११ रोजी जन्मलेली लुसी २७ डिसेंबर २०११ पासून धुळे जिल्हा पोलीस दलात दाखल झाली. दाखल झाली. श्वान लुसी ही लॅब्रेडाॅर जातीची होती. पुणे येथील सीआयडीच्या श्वान प्रशिक्षण केंद्रात तिचे प्रशिक्षण झाले होते. नाशिक येथे झालेल्या कुंभमेळ्यातही तिने कर्तव्य बजावले होते. सेल्वासा केंद्रशासित प्रदेश, नागपूर अधिवेशन, विविध सण-उत्सव, मुख्यमंत्री, राज्यपाल आदी व्हीआयपी दाैऱ्याच्या वेळी घातपातविरोधी तपासणीत लुसीने कामगिरी बजावली होती. श्वान हस्तक हेड काॅन्स्टेबल किरण निकम व पोलीस काॅन्स्टेबल संजीव ठाकरे यांनी तिला वेळोवेळी प्रशिक्षण देऊन तिच्याकडून कामगिरी करून घेतली होती. धुळे जिल्हा पोलीस दलाची शान ठरलेल्या लुसीने बुधवारी निरोप घेतला.
पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी पोलीस उप अधीक्षक प्रदीप पाडवी, बीडीडीएस प्रभारी अधिकारी पोलीस उप निरीक्षक चुनीलाल सैंदाणे, राखीव पोलीस निरीक्षक राठोड, बीडीडीएस कर्मचारी, श्वासन पथकातील अधिकारी आणि कर्मचारी आदींनी पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या आवारात पुष्पगुच्छ अर्पण करून मानवंदना दिली. त्यानंतर दुपारी आर्वी, ता. धुळे येथे फायर बट परिसरात तिचा दफनविधी करण्यात आला. यावेळी बंदुकीच्या तीन फैरी झाडून सलामी देण्यात आली.
नाशिक परिक्षेत्रात दोन वेळा प्रथम
६ जून २०१२ ते १७ ऑक्टोबर २०१२ पर्यंत तिने स्फोटक शोधक प्रशिक्षण घेतले. सन २०१७ आणि २०१८ मध्ये नाशिक येथे झालेल्या पोलीस कर्तव्य मेळाव्यात स्फोटके शोधण्याच्या स्पर्धेत लुसीने नाशिक परिक्षेत्रामध्ये प्रथम क्रमांक पटकावला होता. तसेच सन २०१८ मध्ये पुणे येथे आयोजित महाराष्ट्र राज्य कर्तव्य मेळाव्यात तिने सहभाग घेतला होता.