धुळ्यानजिक टँकरमधून लांबविला ५ टन ६० किलो वजनाचा एलपीजी गॅस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2021 22:43 IST2021-07-03T22:43:15+5:302021-07-03T22:43:41+5:30

मोहाडी पोलिसात तिघांविरुध्द गुन्हा, संशयित फरार

LPG weighing 5 tons 60 kg was removed from a tanker near Dhule | धुळ्यानजिक टँकरमधून लांबविला ५ टन ६० किलो वजनाचा एलपीजी गॅस

धुळ्यानजिक टँकरमधून लांबविला ५ टन ६० किलो वजनाचा एलपीजी गॅस

धुळे : मुंबईकडून जळगावच्या दिशेने जाणारा एलपीजी गॅसच्या टँकरमधून शिताफिने गॅस चोरी करण्यात आली़ हा प्रकार मालकाने केलेल्या उलट तपासणीतून प्रकर्षाने समोर आला आहे़ टँकरमधील दोन चालक आणि एक सहचालक यांनी ५ टन ६० किलो वजनाचा १ लाख ६७ हजार रुपये किंमतीचा गॅस चोरुन घेतल्याचे तपासातून समोर आले़ गॅस टँकर या तिघांनी पळ काढला असून मोहाडी पोलीस ठाण्यात त्यांच्या विरोधात शुक्रवारी गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे़ दरम्यान, तिघे संशयित फरार झाले आहेत़
एमएच ०४ एचएस १२८९ क्रमांकाचा टँकर मुंबईकडून जळगावच्या दिशेने निघाला़ या टँकरमध्ये एलपीजी गॅस भरलेला होता़ चालक मिर्झा आझाद बेग (रा़ धिमा बदलापूर, जुनापूर), नफिज अहमद मोहम्मद ईसा (रा़ पितुकूली, सतपुरा, प्रतापगढ, उत्तरप्रदेश) आणि क्लिनर इम्रान खान (रा़ प्रतापगढ, उत्तरप्रदेश) हे तिघेही त्या टँकरमध्ये होते़ २९ जून रोजी हा टँकर एलपीजी गॅस घेवून मुंबई येथून जळगावच्या दिशेने निघाला़ धुळ्यापर्यंत येत असताना या टँकरमधून परस्पर या तिघांकडून गॅसची चोरी केली जात असल्याचा अंदाज टँकर मालकाला आला़ त्यानुसार, त्याने अचानक टँकर धुळ्यानजिक अडविला़ त्यानंतर गॅसची तपासणी करण्यास सुरुवात केल्यानंतर आपले पितळ उघडे पडेल असे कळताच या तिघांनी पळ काढला़ हे तिघे पळून गेल्याने टँकर मालक हरशरणसिंग जोगिंदरसिंग भाटीया (५३, रा़ टागोरनगर, विक्रोळी ईस्ट, मुंबई) यांचा संशय अधिक बळावला़ चोरीचा हा प्रकार २९ जून रोजी सकाळी ६ वाजून २० मिनीटांपासून ते १ जुुलै रोजी (वेळ नक्की माहिती नाही) या कालावधीत घडल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे़
मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर धुळ्यानजिक हा टँकर पकडण्यात आल्यामुळे मोहाडी पोलिसांना घटनेची माहिती कळविण्यात आली़ पोलिसांनी तातडीने घटनास्थळी येवून टँकर पोलिसांनी जप्त केला़ या टँकरमध्ये भरण्यात आलेला गॅस आणि चोरी झालेला गॅस यांचा ताळमेळ साधण्यात आला असता त्यात चोरी झाल्याचे प्रकर्षाने समोर आले़ या टँकरमधून एलपीजी गॅस ५ टन ६० किलो वजनाचा गॅस चोरून त्याची परस्पर विक्री केल्याचे समोर आले़ चोरीला गेलेला गॅसची किंमत १ लाख ६७ हजार रुपये इतकी आहे़ चोरीला गेलेला गॅसची प्रति किलो ३२ रुपये ९० पैसे इतकी किंमत आहे़
टँकर मालक हरशरणसिंग जोगिंदरसिंग भाटीया यांनी २ जुलै रोजी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास मोहाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली़ त्यानुसार, चालक मिर्झा आझाद बेग (रा़ धिमा बदलापूर, जुनापूर), नफिज अहमद मोहम्मद ईसा (रा़ पितुकूली, सतपुरा, प्रतापगढ, उत्तरप्रदेश) आणि क्लिनर इम्रान खान (रा़ प्रतापगढ, उत्तरप्रदेश) या तिघांविरुध्द भांदवि कलम ४२०, ४०७, ३४ प्रमाणे गुन्ह्याची नोंद करण्यात आली़ घटनेचा तपास सहायक पोलीस निरीक्षक योगेश राजगुरु करीत आहेत़

Web Title: LPG weighing 5 tons 60 kg was removed from a tanker near Dhule

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे