दुकानांवर आयोडीनचे प्रमाण आढळले कमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 22:09 IST2021-02-07T22:09:30+5:302021-02-07T22:09:52+5:30
शिरपूर : बीडीओंनी दिले आरोग्य विभागाला कारवाईचे आदेश

दुकानांवर आयोडीनचे प्रमाण आढळले कमी
शिरपूर : तालुक्यातील काही गावांमध्ये दुकानांवर १५ टक्के पेक्षा कमी आयोडीन असणारे मीठ आढळून आलेले आहे. या संदर्भात आरोग्य विभागाने तपासणी केली असता ही बाब समोर आलेली आहे. त्यामुळे गटविकास अधिकारी युवराज शिंदे यांनी सदर मीठ विक्रेत्या दुकानदारांना लेखी सूचना देऊन शिल्लक मीठ सील करण्याचे आदेश आरोग्य विभागाला दिले आहेत.
तालुक्यातील होळनांथे, विखरण व वाकवड प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत येणाऱ्या गावांमध्ये मिठाची तपासणी करण्यात आलेली होती. जानेवारी २०२१ मध्ये धुळे येथील जिल्हा सार्वजनिक प्रयोगशाळा येथे मीठात आयोडीनचे प्रमाण तपासण्यासाठी पाठविण्यात आलेले होते. त्यात काही दुकानांवरील उपलब्ध असलेल्या मिठामध्ये १५ टक्के कमी आयोडीनचे प्रमाण आढळून आलेले आहे. हे आरोग्याला अतिशय घातक आहे, तसेच ही बाब गंभीर आहे. त्यासाठी ज्या दुकानांवर हे मीठ आढळून आलेल्या त्या दुकानदारांना लेखी आदेश देण्यात यावा. तसेच सदर मिठाचा शिल्लक साठा सील करण्यात यावा व केलेल्या कार्यवाहीचा अहवाल कार्यालयात सादर करण्याचे आदेश गटविकास अधिकारी वाय.डी.शिंदे यांनी दिले आहेत.
यावेळी दुकानदारास आयोजन प्रमाणित मीठ उपलब्ध करून देण्याविषयी प्रभावी आरोग्य शिक्षण देण्यात यावे. या भागात आयोडीनयुक्त मिठाचे महत्त्व व प्रमाण इत्यादी बाबत जनजागृती करण्यात यावी. तसेच या कार्यक्षेत्रातील आरोग्य सेवक व आशा कार्यकर्त्यांना नागरिकांना गलगंड व आयोडीन कमतरतेमुळे होणारे विकार यातील संशयितांचा शोध व आरोग्य संवर्धन या विषयी माहिती असणे आवश्यक असल्याच्याही त्यांनी सूचना दिलेल्या आहेत. यात हिरा ब्रांडच्या पद्मावती सॉल्ट प्रायव्हेट लिमिटेडच्या मिठाचे नमुने घेतले असता त्यांच्या आयोडीनचे प्रमाण कमी आढळून आले आहे.
१५ जानेवारी २०२१ रोजी वकवाड येथे घेण्यात आलेल्या हिरा ब्रँड कंपनीच्या पद्मावती सॉल्ट प्रायव्हेट लिमिटेड या मिठात ११.६४ आयोडीन आढळून आलेले आहे. २० जानेवारी २०२१ रोजी होळनांथे येथे घेण्यात आलेल्या हीरा ब्रँड कंपनीच्या पद्मावती सॉल्ट प्राईवेट लिमिटेड या कंपनीच्या मिठाचे दोन नमुने घेण्यात आले होते. यात एकात १२.७० टक्के तर दुसºया नमुन्यात फक्त ६.३५ टक्के आयोडीन आढळून आले आहे. तर विखरण प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रात २१ जानेवारी २०२१ रोजी घेण्यात आलेल्या दुकानावरून हिरा ब्रँड कंपनीच्या पद्मावती सॉल्ट प्राईवेट लिमिटेड यात ११.६४ टक्के आयोडीन आढळून आलेले आहे.