उशिरा निकाल लागल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2019 12:21 IST2019-05-11T12:20:14+5:302019-05-11T12:21:27+5:30
राष्टÑवादी विद्यार्थी कॉँग्रेसतर्फे जिल्हा प्रशासनाला दिले निवेदन

उशिरा निकाल लागल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान
आॅनलाइन लोकमत
धुळे : विद्यापीठाच्या नियमानुसार परीक्षेनंतर ४५ दिवसात निकाल जाहीर करणे अनिवार्य असतांना, ‘बाटू’ अंतर्गत असलेल्या महाविद्यालयांचे तिसऱ्या सत्राचे निकाल ११५ दिवसानंतर जाहीर झाले त्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान झाले आहे. ‘बाटू’ने आपल्या कारभारात सुधारणा करावी अशी मागणी राष्टÑवादी विद्यार्थी कॉँग्रेसने निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, इंजिनिअरिंगसह विविध महाविद्यालये डॉ. बाबासाहेब आंबेडकर तांत्रिकी विद्यापीठ लोणेरे (रायगड) अंतर्गत येतात. या महाविद्यालयातील विद्यार्थी आॅनलाइन पद्धतीने शुल्क जमा करीत असतात. धुळे जिल्ह्यातील बहुतांश विद्यार्थ्यांचे पालक शेतकरी, शेतमजूर आहेत.
पहिल्या सत्रात एका विषयाची परीक्षा फी १०० रूपये असतांना, दुसºया सत्रात त्याच विषयाची फी ६०० रूपये केली.हे परीक्षा शुल्क कमी करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली.
एखाद्या विषयात विद्यार्थी अनुत्तीर्ण झाल्यास ते पुनर्तपासणीसाठी अर्ज करतात. मात्र त्याचाही निकाल उशिराने लागतो. परीक्षेचे नियोजन शिस्तबद्ध पद्धतीने होत नाही. पेपरची तारीख आदल्या दिवशी जाहीर होते. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होते. निकाल वेळेवर लागला तरी तो विद्यार्थ्यांना दाखविला जात नाही. पहिल्या दिवशी संकेतस्थळावर जाहीर झालेला निकाल दुसºया दिवशी बदललेला असतो. यामुळे विद्यार्थ्यांना मनस्ताप सहन करावा लागतो.
या सर्व कारभारात सुधारणा करण्याची मागणी करण्यात आली.
निवेदन देतेवेळी जिल्हाध्यक्ष गौरव बोरसे, निखिल शिरसाठ, कुणाल पाटील, त्रृषी चव्हाण, पप्पू शिरसाठ, विश्वजित पाटील आदी उपस्थित होते.