मालपूरमध्ये १० दिवसांसाठी लॅाकडाऊन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 04:37 IST2021-04-09T04:37:46+5:302021-04-09T04:37:46+5:30
मालपूर येथील ३९ वर्षीय तरुणाच्या मृत्यूला कोविड-१९ स्थानिक समितीचे कुचकामी धोरण जबाबदार असल्याची ग्रामस्थांमध्ये चर्चा आहे. शासन- प्रशासनाने घालून ...

मालपूरमध्ये १० दिवसांसाठी लॅाकडाऊन
मालपूर येथील ३९ वर्षीय तरुणाच्या मृत्यूला कोविड-१९ स्थानिक समितीचे कुचकामी धोरण जबाबदार असल्याची ग्रामस्थांमध्ये चर्चा आहे. शासन- प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांची काटेकर अंमलबजावणी झाली असती तर कदाचित या तरुणाचे प्राण वाचले असते, अशी चर्चा आहे.
या इसमाच्या मृत्यू नंतर कोरोना रुग्णांची वाढती संख्या बघता स्थानिक ग्रामपंचायत प्रशासन व कोविड समितीने मालपूर गाव दहा दिवसांसाठी अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद ठेवून कडकडीत बंद पाळण्याचा निर्णय घेतला. यात भाजीपाला विक्रेत्यांची दुकानेही बंद करुन फक्त सकाळी ८ ते १० यावेळेत गावात फिरुन विक्रेत्यांनी भाजीपाला विक्री करावा. तसेच विनामास्क कोणी आढळून आल्यास दोनशे रुपये दंड करण्यात येईल, असेही दवंडीत सांगितले आहे.
कोरोनाचे मालपुरात थैमान सुरू असून मृतांच्या संख्येत वाढ झाल्यामुळे ग्रामस्थ आधीच भयभीत दिसून येत आहेत. तर गावातील अनेकजण गुजरातमधील सुरत तसेच नाशिक, शहादा, नंदुरबार, धुळे येथील खासगी रुग्णालयात दाखल असून काही हेंन्टिलेटरवर असल्याचे समजते. तरीसुध्दा ग्रामस्थ बेफिकीरपणे वागत असून बंददरम्यान चौकात, सार्वजनिक ठिकाणी, अनावश्यक गर्दी करुन गप्पा करताना दिसून येत आहेत. अशा प्रकारामुळे गावातील कोरोनाची साखळी कशी तुटेल, असा प्रश्न उपस्थित होत आहे. दरम्यान, ग्रामस्थांनी सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.