४० बिघे कोबी पिकात सोडली गुरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2020 12:04 IST2020-03-16T12:04:03+5:302020-03-16T12:04:30+5:30
कापडणे : बाजारात कवडीमोल भाव मिळत असल्याने शेतकरी हवालदिल लोकमत न्यूज नेटवर्क कापडणे : मोठ्या अपेक्षेने, खर्च करुन वाढविलेल्या ...

dhule
कापडणे : बाजारात कवडीमोल भाव मिळत असल्याने शेतकरी हवालदिल
लोकमत न्यूज नेटवर्क
कापडणे : मोठ्या अपेक्षेने, खर्च करुन वाढविलेल्या कोबी पिकाला बाजारात कवडीमोल भाव मिळत असल्याने येथील शेतकऱ्याने ४० बिघे शेतातील कोबी पिक गुरांसाठी चरायला मोकळे केले आहे. तर काहींनी कोबीच्या शेतात रोटाव्हेटर फिरविला आहे.
यंदाच्या खरीप हंगामात सुरुवातीला पावसाचा खंड असला तरी पावसाळ्याच्या अखेरच्या महिन्यात आॅक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर २०१९ या तीन महिन्यात मोठ्या प्रमाणात पर्जन्यवृष्टी झाल्याने सर्वत्र नदी-नाले, कूपनलिका पाण्याने तुडुंब भरलेल्या आहेत.
यामुळे रब्बी हंगामात शेतकऱ्यांनी दरवर्षीपेक्षा बागायतीचे क्षेत्र अधिक घेतले. शेती उत्पादन मोठ्या प्रमाणात निघत असल्याने त्याचा परिणाम मागणी कमी व पुरवठा जास्त असा झाला. यामुळे सर्वत्र शेती पिकांच्या उत्पादित मालाच्या भावात घसरणीला सुरुवात झाली आहे.
कापडणे येथील ४० ते ५० शेतकºयांनी सुमारे ४० एकर शेत जमिनीत फुलकोबी व गड्डा कोबीचे पिक घेतले आहे. यासाठी प्रत्येक शेतकºयाने सुमारे तीस ते चाळीस हजार रुपये खर्च केले आहे. मात्र, कोबीला कवडीमोल भाव मिळत असल्याने कोबीचे उत्पादित पीक बाजारात घेऊन जाणेही परवडत नाही. मिळणाºया भावात गाडी भाडे देखील निघत नसल्याने तोटा अजून वाढत आहे.
अखेर शेतकºयांनी तयार झालेल्या कोबी पिकाच्या शेतात गुरे, शेळ्या, मेंढ्यांना चरण्यास सोडले आहे. काही शेतकºयांनी कोबी पिकात रोटाव्हेटर मशीन फिरवून कोबीचे क्षेत्रफळ रिकामे केले आहे. काही शेतकºयांनी खरीप हंगामासाठी शेती तयार केली जात आहे.
मार्केटमध्ये कोबी फेकून परतले शेतकरी
कापडणे येथील भाजीपाला पीक घेणारे बहुतांश शेतकरी सुरत येथील सरदार मार्केटमध्ये कोबी विक्रीसाठी गेले.
मात्र, भाव मिळत नसल्याने अक्षरश: मार्केटमध्ये कोबी फेकून परत आले. खिशातून गाडीचे भाडे द्यावे लागत असल्याने अखेर शेतकºयांनी कोबीच्या पिकात गुरे चारण्यास सुरुवात केली आहे.
दीड ते दोन रुपये किलोचा भाव
सद्यस्थितीत फुलकोबी, गड्डा कोबी, कोथिंबीर, मेथी, मिरची, टमाटे, वांगे, दुधी भोपळा आदी भाज्यांना होलसेल मार्केटमध्ये दीड ते दोन रुपये किलोप्रमाणे भाव मिळत आहे. यामुळे शेतकºयांना मोठा आर्थिक फटका बसला आहे, असे कापडणे येथील कोबी उत्पादक शेतकरी सुरेश दयाराम बोरसे, अमोल सुरेश बोरसे, अनिल नथू सूर्यवंशी, नरेंद्र नथ्थू सूर्यवंशी, अधिकार माळी आदी शेतकºयांनी सांगितले.