ग्रामीण भागातील कामगार महिलांना सक्षमीकरणाचे धडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2020 21:11 IST2020-12-19T21:11:10+5:302020-12-19T21:11:30+5:30
बोरकुंडला झाला प्रशिक्षण कार्यक्रम

dhule
धुळे : बोरकुंड ता. धुळे येथे स्वयंसेवी संस्था आणि शासनाच्या माध्यमातून नुकत्याच पार पडलेल्या कार्यक्रमात ग्रामीण भागातील अनुसूचित जाती, जमातीच्या कामगार महिलांना हक्क, अधिकार, शासनाच्या विविध योजना, बचत गटाचे महत्व याबाबतचे प्रशिक्षण देवून सक्षमीकरणाचे धडे देण्यात आले.
केंद्र सरकारचे दत्तोपंत ठेंगडी राष्ट्रीय श्रमिक शिक्षा व विकास बोर्ड नाशिक विभाग आणि इंदुबाई भदाणे प्रतिष्ठान, बोरकुंड. ता. धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने दोन दिवसीय अनुसूचित जाती व जमातीच्या कामगार महिलांसाठी सक्षमीकरण कार्यक्रम नुकताच बोरकुंड जिल्हा परिषद शाळेत झाला.
या उपक्रमाला नाशिक विभागाच्या कामगार शिक्षणाधिकारी आणि प्रादेशिक संचालक प्रभारी सारिका डफरे, सामाजिक कार्यकर्ते विजय देसले इंदुबाई भदाणे प्रतिष्ठानचे सल्लागार संदीप देवरे कार्यक्रम समन्वयक शामकांत सोनवणे आदी उपस्थित होते.
सावित्रीमाई फुले यांना पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. महिलांची नोंदणी करुन त्यांना नोटपॅड व पेन देण्यात आला. एकूण ३४ महिला उपस्थित होत्या.
कार्यक्रमाची प्रस्तावना राजश्री पाटील यांनी केली. विजय देसले यांनी महिलांना महिला बचत गटाच्या माध्यमातून पुढे येण्याचे आवाहन केले व खाजगी कर्जाचे तोटे या विषयी माहिती दिली. आरोग्य साक्षरता ,व्यसनाधीनता ,आर्थिक साक्षरता या विषयांवर संदीप देवरे यांनी महिलांना मार्गदर्शन केले.
सारिका डफरे यांनी अनुसूचित जाती व जमातीसाठी असलेल्या संविधानातील तरतुदी, कायदा व योजना महिलांना समजेल अशा शब्दात विशद केला. तसेच शिक्षणाचे महत्त्व व लिंगसमभाव समजून सांगितला. अंधश्रद्धा निर्मूलन याविषयी मार्गदर्शन केले.
श्यामकांत सोनवणे यांनी माझी कन्या भाग्यश्री योजना, प्रधानमंत्री जनधन योजना, प्रधानमंत्री जीवन ज्योति योजना, अनुसुचित जाती जमातींसाठीच्या योजना विविध शासकीय योजना विषयी मार्गदर्शन केले.
गोविंदा साळुंके यांनी महिला बचत गट उद्योग विषयावर मार्गदर्शन केले व लॅपटॉपवर महिला बचत गटाच्या यशस्वी गाथा दाखविल्या. भिल्ल समाजातील पहिले जिल्हाधिकारी राजेंद्र भारूड यांचा प्रेरणादायी व्हिडीओ दाखविला. राजश्री पाटील यांनी महिला बचत गट, शारीरिक आरोग्य, मनाचे आरोग्य व स्वच्छता यावर माहिती दिली. महिलांसाठी विविध प्रात्यक्षिके घेण्यात आली. महिलांनी इंदुबाई भदाने प्रतिष्ठान व कामगार शिक्षण मंडळ यांचे आभार मानले व भविष्यात आणखी कार्यक्रम व्हावा अशी इच्छा दर्शवली.