अमरावती प्रकल्पाला गळती, पाण्याची नासाडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:37 IST2021-04-04T04:37:10+5:302021-04-04T04:37:10+5:30

एप्रिल, मे महिन्यातील कडाक्याचे ऊन पाण्याच्या प्रत्येक थेंबाचे महत्त्व किती आहे, याची जाणीव करून देते. घोटभर पाण्यासाठी जिवाची लाही ...

Leakage to Amravati project, water leakage | अमरावती प्रकल्पाला गळती, पाण्याची नासाडी

अमरावती प्रकल्पाला गळती, पाण्याची नासाडी

एप्रिल, मे महिन्यातील कडाक्याचे ऊन पाण्याच्या प्रत्येक थेंबाचे महत्त्व किती आहे, याची जाणीव करून देते. घोटभर पाण्यासाठी जिवाची लाही लाही होत असते, तर हंडाभर पाण्यासाठी रणरणत्या उन्हात मालपूरकरांनी रानोवन भटकंती दोन वर्षांपूर्वी केली होती. ही सर्व उदाहरणे ताजी असताना डोळ्या देखत हे पाणी दररोज वाहून जाताना सर्वसामान्यांचा जीव कासावीस होत आहे. तर पाटबंधारे विभागाला याचे कुठलेही सोयरसुतक दिसून येत नाही.

मालपूर परिसरातील पावसाळ्यातील वाहून जाणारे पाणी अडविण्यासाठी हा एकमेव प्रकल्प आहे. हा प्रकल्प ओव्हरफ्लो झाल्यानंतर गाव शिवारातील तसेच तालुक्यातील विखरण तलाव भरण्यासाठी पाणी सोडले जाते. मागील वर्षी तुलनेने कमी पर्जन्यमान झाले तरी हा प्रकल्प ओव्हरफ्लो झाला याला मुख्य कारण पाण्याची केलेली बचत. अन्यथा येथे आज खडखडाट राहिला असता. विखरण तलाव भरण्यासाठी पाणी सोडण्याचा प्रश्नच आला नसता. कारण आडात नाही तर पोहऱ्यात कुठून येईल. म्हणून शिंदखेडा तालुक्यातील पश्चिम भागातील प्रत्येक नागरिकाने या पाण्याच्या बचतीकडे लक्ष दिले पाहिजे, तरच पावसाळ्यात पाणी सोडण्यासाठी प्रकल्पावर धाव घेता येईल. यामुळे लहान लहान बंधारे भरता येतात व विहिरींना त्यामुळे त्वरित पाझर फुटून शेतशिवार हिरवेगार दिसून येते. या बंधाऱ्याची साठवणूक क्षमता कमी असल्यामुळे लगेच कोरडे होतात. या बंधाऱ्यांना जिवंत ठेवण्यासाठी अमरावती मध्यम प्रकल्पात पाणी असणे गरजेचे आहे. यासाठी ही पाण्याची बचत करणे खूप आवश्यक आहे अन्यथा धरण उशाला व कोरड घशाला लागेल.

या प्रकल्पाच्या दोन्ही कालव्यांच्या मुख्य वितरिका, मुख्य सांडव्यामधून बेसुमार पाणी गळती दिसून येत आहे. ही गळती थांबविण्यासाठी प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी नागरिकांनी देखील पावले उचलली पाहिजेत. नाही तर आजचे हिरवागार शेतशिवार येणाऱ्या वर्षी रणरणत्या उन्हात भाजून निघेल व पुन्हा प्रकाश बुराई उपसा सिंचन योजनेची स्वप्ने पडू लागतील व हातचे सोडून पळत्याच्या मागे धावावे लागेल.

Web Title: Leakage to Amravati project, water leakage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.